मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संविधानाचा औचित्यभंग केला आहे. त्यांच्याकडून राज्याच्या राजकारणात हस्तक्षेप सुरु आहे. त्यांच्याकडून संविधानाचा आणखी उपमर्द घडण्यापूर्वी राष्ट्रपतींनी त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून (माकप) करण्यात आली आहे. (communist party of india criticize Govornr Bhagatsingh koshyari )
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी पत्र लिहले होते. यामध्ये राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्त्वाचा दाखला देत मंदिरे उघडावीत, असे सुचवले होते. राज्यपालांच्या या भूमिकेमुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर माकपने पत्र लिहून राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. संविधानातील ‘धर्मनिरपेक्षता’ या पायाभूत तत्त्वाचा उपहास करून महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांनी संविधानाचा घोर औचित्यभंग केला आहे. राज्याला महामारीने ग्रासलेले असताना मंदिरासारखी सार्वजनिक आणि हमखास गर्दीची ठिकाणे उघडण्याचा अनाठायी सल्ला राज्यपाल महोदयांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्राने दिला आहे. असा घातक सल्ला देत असतानाच राज्यपाल महोदयांनी संविधानातील धर्मनिरपेक्षता या पायाभूत तत्त्वाची अवहेलना केली आहे.
ज्या संविधानाची शपथ घेऊनच आपण हे संविधानिक पदग्रहण केले आहे, यांचा त्यांना सोयीस्कर विसर पडलेला दिसतो. हा सल्ला जनतेच्या भल्यासाठी नसून त्यामागे खोडसाळ राजकीय उद्दिष्ट आहे, हे स्पष्ट आहे. असा सल्ला आणि त्यासाठी वापरलेली अशोभनीय भाषा राज्यपाल पदाचे अवमूल्यन करणारी आहे, असे माकपने म्हटले आहे.
तसेच राज्यपाल महोदय राज्याच्या राजकारणात नसता हस्तक्षेप करू लागले आहेत, याविषयी संशयाला जागाही राहिलेली नाही. परिणामी विद्यमान राज्यपाल महोदय हे राज्याच्या आरोग्याला हानिकारक बनले आहेत, असे ‘माकप’ला नाईलाजाने म्हणावे लागत आहे. आपल्या अशोभनीय राजकीय हस्तक्षेपामुळे आपल्या राष्ट्रपतींवर राज्यपालांनी दुर्धर प्रसंग आणला आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी संविधानाची अवहेलना थांबवण्यासाठी राज्यपाल महोदयांना त्वरित पायउतार करावे, अशी मागणी माकपने केली आहे.
संबंधित बातम्या:
‘राज्य सांभाळता येत नसल्याने उद्धव ठाकरेंचा तोल सुटतोय; राज्यपालांशी अहंकाराने बोलणे शोभते का?’
माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, उद्धव ठाकरे राज्यपालांवर बरसले
(communist party of india criticize Govornr Bhagatsingh koshyari )