इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानने पत्रकार परिषद घेऊन भारताला चर्चेचं आवाहन केलंय. युद्ध सुरु झाल्यास ते संपवणं ना माझ्या हातात असेल, ना नरेंद्र मोदींच्या. त्यामुळे एकत्र बसून चर्चा करणे हाच एकमेव तोडगा आहे, असं इम्रान खानने म्हटलंय. शिवाय सर्व प्रकारच्या चौकशीसाठी सहकार्य करायला तयार असल्याचंही इम्रानने सांगितलं.
इम्रान खान म्हणाला, “जे वातावरण सध्या तयार केलं जातंय ते चुकीचं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर आम्ही चौकशीचं आश्वासन दिलं होतं. पाकिस्तानही गेल्या 10 वर्षांपासून दहशतवादाशी लढत आहे. चौकशीसाठी तयार आहोत हेही आम्ही भारताला सांगितलं होतं. पाकिस्तानची जमीन दहशतवादासाठी वापरावी हा आमचा हक्क नाही, असं स्पष्टीकरण इम्रान खानने दिलं.
इम्रानने यासोबतच युद्धाची धमकीही दिली. मी सांगितलं होतं की उत्तर देणं ही आमची मजबुरी असेल. भारताने काल सकाळी कारवाई केली. आम्हाला माहित नव्हतं किती नुकसान झालंय. आज आम्ही कारवाई केली. आम्हाला फक्त आमची ताकद दाखवायची होती. तुम्ही आमच्या देशात येऊ शकता तर आम्हीही तुमच्या देशात येऊ शकतो. भारताची दोन विमानं पाडण्यात आली. त्यांचे पायलट आमच्या ताब्यात आहेत. जेवढे युद्ध झालेत, त्यात चुका झाल्या आहेत, असं म्हणत इम्रान खानने युद्धांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला.
इम्रान खानने अप्रत्यक्षपणे अणुबॉम्बचीही धमकी दिली. इम्रान म्हणाला, दोन्ही देशांकडे सध्या जी शस्त्र आणि स्फोटकं आहेत, त्याने युद्ध कुठे जाऊ शकतं याचा विचार करा. हे युद्ध रोखणं ना माझ्या हातात असेल, ना नरेंद्र मोदींच्या. आम्ही पुन्हा सांगतो, की पुलवामाच्या चौकशीसाठी आम्ही तयार आहोत, असंही इम्रान खान म्हणाला.
VIDEO :