नवी दिल्ली | 17 फेब्रुवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) दोन दिवसांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी अबुधाबीमध्ये पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले. पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबईच्या जेबेल अली फ्री ट्रेड झोनमध्ये ‘भारत मार्ट’ची पायाभरणी केली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या याच पायाभरणीमुळे चीनच्या डोक्याला झिणझिण्या आल्या आहेत. दुबईतील भारत मार्ट प्रकल्प स्वावलंबी भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जाते. हा प्रकल्प 2025 पर्यंत पूर्ण होऊन कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.
भारत मार्ट हे एक लाख चौरस जमिनीवर बांधलेले एक व्यापार केंद्र असेल. भारतीय कंपन्यांना आंतरराष्ट्रीय खरेदीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हे एक प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे. भारत मार्ट याची निर्मिती डीपी वर्ल्ड करणार आहे. भारत मार्ट हे भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) उत्पादनांना आखाती, पश्चिम आशिया, आफ्रिका आणि युरेशिया प्रदेशातील आंतरराष्ट्रीय खरेदीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.
भारत मार्ट दुबईतील जेबेल अली बंदराजवळ बांधले जात आहे. येथे भारतीय कंपन्यांना गोदाम सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे भारतीय MSME कंपन्यांना आंतरराष्ट्रीय खरेदीदारांपर्यंत सहज पोहोचता येणे शक्य होणार आहे. ज्या एमएसएमई कंपन्यांना अमेरिका, युरोप, पश्चिम आशिया आणि इतर पाश्चिमात्य देशांमध्ये आपली उत्पादने पुरवायची आहेत त्यांच्यासाठी भारत मार्ट वरदान ठरणार आहे. ‘भारत मार्ट’मुळे कंपन्यांचा निर्यात खर्च कमी होईल. तसेच, भारतीय उत्पादकांची अनेक उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
दुबईमध्येच चीनचे ड्रॅगन मार्ट आहे. चिनी कंपन्यांच्या उत्पादनांचे हे आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र आहे. ड्रॅगनच्या आकारात बनवलेले हे मार्ट चिनी कंपन्यांच्या उत्पादनांनी भरलेले आहे. सुमारे 1 लाख 50 हजार चौरस मीटरवर ड्रॅगन मार्ट बांधले गेले आहे. येथे सुमारे 4000 किरकोळ दुकाने आहेत. या ड्रॅगन मार्टच्या शेजारी नवीन ड्रॅगन मार्ट-2 देखील सुरू झाले आहे. यात रेस्टॉरंट, हॉटेल आणि सिनेमा हॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
चीनचे ड्रॅगन मार्ट जिथे आहे त्याच शहरात आता अत्याधुनिक भारत मार्टची पायाभरणी झाली. त्यामुळेच चीन तणावात आला आहे. भारत मार्ट 2025 पर्यंत कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे येथे असलेली चीनची मक्तेदारी आता संपुष्टात येणार आहे.
भारत आणि UAE ने 2030 पर्यंत गैर-पेट्रोलियम उत्पादनांची आयात-निर्यात 8.3 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत मार्ट हे संयुक्त अरब अमिरातीसह इतर देशांसाठी प्रभावी ठरणार आहे. भारत मार्ट कार्यान्वित झाल्यास चिनी वस्तूंना परदेशी बाजारपेठेत स्पर्धेला सामोरे जावे लागेल. याशिवाय भारतीय उत्पादने मध्य-पूर्व, मध्य आशिया, युरोप आणि इतर पाश्चात्य देशांच्या बाजारपेठा काबीज करेल अशीही भीती चीनला वाटत आहे.