पुणे : कोरोना संसर्गासोबत मृत्यूंच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. अशातच आता पुण्यात एका 2 महिन्याच्या कोरोनाग्रस्त बालकाचा मृत्यू दडपण्याचा धक्कादायक प्रयत्न समोर आला आहे (Death of corona infected child in Pune). संबंधित बालकाच्या मृत्यूनंतर तब्बल 7 दिवसांनी पालिकेकडे या मृत्यूची माहिती आली. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित खासगी रुग्णालयाला नोटीस बजावणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
संबंधित बालकाला उपचारासाठी 3 जून रोजी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. स्वॅब तपासणीनंतर बालकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं. यानंतर या बाळावर कोरोनाचे उपचारही सुरु होते. मात्र, 7 जून रोजी या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र यासंदर्भात शनिवारपर्यंत (13 जून) आरोग्य विभागाला कल्पनाच नव्हती. महापालिकेकडून दररोज नवीन कोरोना रुग्णांची, कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि उपचारानंतर बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची माहिती पुणे महानगरपालिकेकडे पाठवली जाते. मात्र, गेल्या 7 दिवसांपासून या 2 महिन्याच्या कोरोनाबाधित बाळाच्या मृत्यूची माहिती दिलीच गेली नाही. अखेर शनिवारी अहवालात बालकाच्या मृत्यूच्या तारखेवरुन ही माहिती समोर आल्याने हा प्रकार उघड झाला.
पुण्यातील या खासगी रुग्णालयाने ही घटना लपवण्याचा प्रयत्न का केला, यामागे रुग्णालयाचा काय उद्देश होता असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रकरणी संबंधित खासगी रुग्णालयाला नोटीस बजावणार असल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. आता यात हे खासगी रुग्णालय काय सांगते आणि त्यावर महापालिका काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, पुणे विभागात कोरोनामुक्त होणाऱ्या (Pune Corona Recovery Rate) रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. विभागात 9 हजार 105 कोरोनाबाधित रुग्ण बरे झालेत. सध्या विभागात 14 हजार 650 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 4 हजार 887 अॅक्टिव्ह रुग्ण असून 658 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 271 रुग्ण गंभीर असून वेगवेगळ्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विभागात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62. 15 टक्के असल्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर (Pune Corona Recovery Rate) यांनी सांगितलं.
पुणे जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण?
विभागात सर्वाधिक जास्त कोरोनाचा प्रादुर्भाव पुणे जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात सध्या 11 हजार 397 बाधित रुग्ण असून 7 हजार 110 रुग्ण बरे झाले आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 3 हजार 811 असून 476 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 263 रुग्ण गंभीर आहेत. जिल्हयामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.38 टक्के आहे.
संबंधित बातम्या :
मिशन बिगीन अगेननंतर महाराष्ट्रात कोरोनाचा धुमाकूळ, अवघ्या 6 दिवसात तब्बल 18 हजार 500 रुग्ण
व्हिडीओ पाहा :