मुंबई : कोरोनामुळे देशात सुरु असलेला लॉकडाऊन केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत वाढवला (Prohibited activities across Maharashtra in Lockdown 5). आता यानंतर महाराष्ट्रा सरकारने देखील याबाबत आपली नियमावली जाहीर केली आहे. यात राज्य सरकारने कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता केंद्राने सूट दिलेल्या काही गोष्टींसह एकूण 9 गोष्टींवरील निर्बंध कायम ठेवले आहेत. केंद्र सरकारने शनिवारी (30 मे) अनलॉक 1 म्हणून जाहीर केलेल्या लॉकडाऊन 5 ची घोषणा केली. तसेच राज्य सरकारला पुढील निर्णय घेण्याचे अधिकार दिले. यानुसारच महाराष्ट्र सरकारने हाच ही सुधारित नियमावली जाहीर केली.
राज्यभरात बंदी असलेल्या 9 गोष्टी
1. शाळा, महाविद्यालयं, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण संस्था राज्यभरात बंद राहतील.
2. गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या वाहतुकी व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद असेल.
3. मेट्रो रेल्वे बंद राहतील
4. प्रवाशांना विमानाने अथवा रेल्वेने प्रवासास बंदी असेल. विशेष परिस्थितीत नियमांचं पालन करुन दिलेली परवानगी असेल तर त्यांना परवानगी दिली जाईल.
5. सिनेमागृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार आणि सार्वजनिक कार्यक्रमाची स्थळं हेही बंद असतील.
6.सामाजिक, राजकीय, खेळविषयक, मनोरंजन, विद्यापीठीय, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांना/सभांना बंदी असेल.
7. धार्मिक स्थळं आणि प्रार्थना स्थळं नागरिकांसाठी बंद असतील.
8. केशकर्तनालये, सौदर्य प्रसाधने (ब्युटी पार्लर), स्पा, सलून बंद असतील.
9. शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि इतर सेवा बंद राहतील.
या सर्व गोष्टींवरील निर्बंध पुढील टप्प्यांमध्ये नियमांनुसार काढले जातील.
3 जूनपासून ‘या’ गोष्टींना परवानगी
सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांना परवानगी. सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत खाजगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्र किनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायामाला मुभा, केवळ इनडोर स्टेडियममध्ये परवानगी नाही.
सामुहिक (ग्रुप) अॅक्टिविटीजना परवानगी नाही. लहान मुलांसोबत पालकांना थांबणे अनिवार्य आहे. केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास जाण्याची सूचना, मोकळ्या जागेतील गर्दीची ठिकाणे टाळावी.
सायकलिंग करण्यास अधिक प्रोत्साहन, यातून शारीरिक व्यायामासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते.
प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञ यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे. गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत.
सर्व सरकारी कार्यालये गरजेनुसार किमान 15 टक्के कर्मचारी वर्ग किंवा किमान 15 कर्मचारी (जे अधिक असेल ते) यामध्ये काम करतील.
दरम्यान, राज्य सरकारने देखील केंद्राने सांगितलेल्या 10 महत्त्वाच्या गोष्टींचं पालन बंधनकारक केलं आहे. त्या 10 गोष्टी खालीलप्रमाणे,
लॉकडाऊन 5 मध्ये या 10 गोष्टी पाळाव्याच लागणार
1. तोंड झाकणे – सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवास करताना आपलं तोंड झाकणं बंधनकारक असणार आहे.
2. शारीरिक अंतर – प्रत्येक व्यक्तीने एकमेकांपासून 6 फूट अंतर पाळणं अत्यावश्यक आहे. दुकानं आणि खरेदीच्या ठिकाणी संबंधितांनी ग्राहकांमध्ये हे अंतर पाळलं जाईल यासाठी काळजी घ्यायची आहे. तसेच एकावेळी 5 हून अधिक व्यक्ती असणार नाहीत याचीही खबरदारी घ्यायची आहे.
3. सार्वजनिक कार्यक्रम – सार्वजनिक कार्यक्रमांवर अजूनही निर्बंध कायम असणार आहेत. लग्नासाठी अधिकाधिक व्यक्तींची संख्या 50 हून कमी निश्चित करण्यात आली आहे. तसेच अंत्यसंस्कारासाठी ही संख्या 20 इतकी मर्यादित ठेवण्यात आली आहे.
4. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा गुन्हा मानून संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
5. सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन, पान-गुटखा-तंबाखू सेवन यावरही बंदी असेल.
6. वर्क फ्रॉम होम – शक्य तितक्या ठिकाणी घरुन काम करण्याचा (वर्क फ्रॉम होम) प्रयत्न करावा.
7. कामाची ठिकाणं, दुकानं, बाजार, इंडस्ट्रीअल ठिकाणं आणि व्यावसायिक केंद्र यांनी वेळीची बंधनं पाळणं आवश्यक आहे.
8. स्वच्छता आणि तपासणी – प्रवेश, बाहेर पडण्याचे मार्ग आणि एकत्र जमण्याची सामाईक ठिकाणं येथे तापमान तपासणी, हँड वॉश आणि सॅनिटायझरची व्यवस्था करावी.
9. कामाच्या ठिकाणी दैनंदिन स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण अत्यावश्यक आहे. दरवाजाच्या हँडल आणि इतर अशी ठिकाणं जिथं अनेकांचा स्पर्श होतो त्या ठिकाणांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण शिफ्टप्रमाणे करणं गरजेचं असेल.
10. कामाच्या ठिकाणी त्या ठिकाणच्या प्रमुखांनी शारीरिक अंतर पाळलं जाईल, दोन शिफ्टमध्ये अंतर राहिल आणि जेवणाच्या ठिकाणी देखील खबरदारी जाईल यावर बारकाईने लक्ष ठेवावं.
संबंधित बातम्या :
Maharashtra Mission Begin Again | तीन टप्प्यात शिथिलता येणार, कोणत्या टप्प्यात काय सुरु?
Lockdown 5.0 : प्रवासासाठी परवानगीची गरज नाही, लॉकडाऊन 5 चे नियम आणि टप्पे कोणते?
LOCKDOWN 5.0 | देशातील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला, केंद्र सरकारकडून नियमावली जारी
Prohibited 9 activities across Maharashtra in Lockdown 5