वर्धा : पुलगाव येथील दारूगोळा स्फोट प्रकरणातील आरोपी शंकर माणिकलाल चांडक याला पोलिसांनी अखेर बेड्या घातल्या. शंकर चांडक हा कामगार पुरवठा कंत्राटदार आहे. 20 नोव्हेंबरला पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडार परिसरात स्फोटकं हाताळताना स्फोट होऊन सहा कामगारांचा मृत्यू झाला होता. तर यात 19 कामगार गंभीर जखमी झाले होते. ही दुर्घटना कंत्राटदार शंकर चांडक याच्या हलगर्जीपणामुळे झाली होती. स्फोटकं हाताळण्यासाठी अकुशल कामगार पुरवल्याचा गुन्हा चांडकवर आहे.
स्फोटकं हाताळने हे जोखमीचे व अतिसंवेदनशील काम असते. त्यामुळे तज्ञांच्या निरीक्षणाखाली हे काम केलं जातं. दारूगोळा ट्रकमधून खाली उतरवणे, खड्डे खोदणे, तज्ञ सांगतील त्या ठिकाणी दारूगोळा पोहोचवणे इत्यादी कामांसाठी कामगारांची गरज असते. अशा कामगारांची आऊटसोर्सिंग आरोपी शंकर चांडकने केली होती. या धोकादायक कामासाठी अकुशल व अप्रशिक्षित कामगार पुरवल्यामुळे चांडकविरोधात देवळी पोलिसांनी २५ नोव्हेंबरला भांदवीच्या कलम ३०४ अंतर्गत सदोष मनुष्यवध व सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे असे दोन गुन्हे दाखल केले होते.
या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी चांडकने वर्धा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज २८ नोव्हेंबरला न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र शंकर चांडक याचा अटकपूर्व जामीन शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही फेटाळून लावला.
न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी शनिवारी रात्री देवळी येथून आरेपी शंकर चांडकला अटक केली.
चांडकनुसार, आयुध निर्माणी खामरिया येथील कालबाह्य झालेले अॅम्युनेशन १९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत पुलगाव येथील विस्फोट साईटवर नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या कामासाठी १३ डेंजर बिल्डिंग वर्कर, दोन कर्मचारी, दोन कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी आणि दोन आयुध तंत्रज्ञ नियुक्त करण्यात आले होते. तर कंत्राटदाराकडून अकुशल कामगार मागवण्यात आले होते. आयुध निर्माणीच्या विस्फोट साईटवर खड्डे खणणे, त्यात निकामी करावयाची विस्फोटके टाकणे, त्यावर रेतीचे पोते टाकणे इतकेच काम कंत्राटदाराच्या कामगारांना देण्यात आले होते.
एका नियंत्रित पद्धतीने आयुध निर्माणचे अधिकारी व संरक्षण दलातील अधिकाऱ्यांच्या देखरेखीत निकामी झालेले अॅम्युनेशन स्फोट करून नष्ट करण्यात येतात. या संपूर्ण प्रक्रियेत कंत्राटदाराचा कोणताही सहभाग नसतो. त्यामुळे या घटनेशी आपला कुठलाही संबंध नसताना आपल्यावर कारवाई करण्यात येत असल्याने अटकपूर्व जामीन देण्यात यावा, अशी विनंती शंकर चांडकने अर्जात केली होती. मात्र, न्यायालयाने कंत्राटदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला.