अजितदादा, तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला नसेल. महात्मा फुल्यांचे सार्वजनिक सत्य धर्म वाचले नसेल. सेतू माधव पगडी वाचले नसतील. पण, दादा हा प्रश्न विचारून तुम्ही शिव शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. कारण पुरोगामी विचार हा व्यवस्थेला प्रश्न विचारतो. हेच प्रश्न विचारले नसते. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कधीच समोर आला नसता. प्रश्नच विचारले नसते तर हा अजित दादा 13 वर्ष पालकमंत्री होता. का छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास करावा वाटला नाही?, असा सवाल करत शिरूरचे महाविकास आघाडीचे शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे.
अजितदादा आजकाल खासगीतल्या गोष्टी बोलायला लागलेत. पण अशा गोष्टी बोलायला बसलो तर मग अनेक गोष्टी निघतील. दादा सगळीकडे सांगत आहेत की, अमोल कोल्हे राजीनामा देण्याचं सांगत होते. मला बघितलं अशी प्रेस कॉन्फरन्स घेताना मी समोर कधी बोललोय? पण आदरणीय दादा तुम्हाला टीव्हीवर भावूक होऊन राजीनामा देतो आणि शेती करायला जातो हे सांगताना आम्ही बघितलं आहे. खासगीतलच बोलायचं असेल तर ज्या भाजपची तळी घेऊन एका शेतकऱ्यांच्या पोराला पाडायला येताय. याच भाजपने जेव्हा तुम्ही सभागृहात छत्रपती संभाजी महाराजांना स्वराजरक्षक म्हणाला होता. त्यावेळी जोडा मारा आंदोलन केलं होतं, असंही अमोल कोल्हे म्हणाले.
काही बारामतीतले लोक म्हणतात अजितदादा आम्ही जीव लावून काम करतोय. माझा कढीपत्ता करु नका… मग माझ्या सारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडला. काल बारामतीतला कौल हा EVM मध्ये बंद झाला. सुप्रियाताईंना निवडून द्यायचं ठरवलं. अजित पवारांविषयी माझ्या मनात आस्था आहे. पण 27 जून 2023 पूर्वीच्या अजित पवारांविषयी आस्था होती, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय.
योद्धा शरण जात नाही, म्हणून त्याला बदनाम केलं जातं. बारामतीतून काही पाव्हणे आलेत. बारा-बारा सभा घेतायेत. आता कळलं त्यांचे प्रदेशाध्यक्ष येतायेत. एका शेतकऱ्यांच्या पोराला पाडायला सगळे राष्ट्रीय नेते एकत्र आलेत. कांदा निर्यातबंदी उठवली, अस कोणी तरी सांगेल, पण परत एकदा धूळफेक केली, आपल्याला हातोहात फसवलं आहे. महायुतीचे उमेदवार आले की विचारा खोटी आशा दाखवून तोंडाला पान पुसली. याच भागात येऊन रामलिंग महाराजांची खोटी शपथ कोणी घेईल असं वाटलं नव्हतं. माझा काहीही संबंध नाही असं सांगितलं. मग कशाला पोराला व्हीडीओ करायला लावला? काल त्यांच्या चिरंजीवांनी व्हीडीओ केला. मायबाप मतदारांनी निवडून दिल्यावर कंपनीचे साटलोट करता त्याचं उत्तर द्या, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.