पुणे : पुणे शहरासह ग्रामीण भागालाही कोरोनाचा विळखा बसला (Pune Corona Positive Cases) आहे. पुण्यात रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली आहे. या दाम्पत्याच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर आता या दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. तर दुसरीकडे पुण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या आईला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका कोरोना (Pune Corona Positive Cases) पॉझिटिव्ह वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर या महिलेच्या मुलाचे आणि तिच्या गरोदर सुनेचे नमुने घेण्यात आले. त्यांना विलगीकरण कक्षात न ठेवता त्यांना संध्याकाळी घरी सोडण्यात आलं.
पुण्याच्या रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. हे दोघेही कोरोना रुग्णाच्या जवळचे होते. मात्र तरीही त्यांना घरी का सोडण्यात आलं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पोलीस कर्मचाऱ्याच्या आईला कोरोना
तर दुसरीकडे पुण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या आईला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या भावालाही तपासणीसाठी दाखल करण्यात आलं आहे.
दोन दिवसांपूर्वी त्याच्या आईची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. वायसीएम येथे त्यांची कोरोना तपासणी केली असता, त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे उघड झालं. या पोलीस कर्मचाऱ्याच्या आईची प्रकृती स्थिर आहे.
पुणे शहर पोलीस दलातील (परिमंडळ 4) मध्ये हा अधिकारी काम करतो. हा पोलीस कर्मचारी एका पोलीस वसाहतीत राहतो.
पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी
त्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या लहान भावाला देखील तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. या पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कातील व्यक्ती आणि पोलीस कर्मचारी यांच्या नोंदी घेण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान पोलीस कर्मचारी सेवेत असणाऱ्या पोलीस ठाण्यातील एक अधिकाऱ्याची कोरोना टेस्ट घेण्यात आली. तसेच दोन कर्मचारी आणि एका महिला कर्मचाऱ्याचीही तपासणी करण्यात आली. मात्र सुदैवाने यातील कोणालाही याचा संसर्ग झालेला नाही.
मात्र आजाराचा संसर्ग होऊ नये. तसेच त्यांच्या प्रकृतीची काळजी योग्य वेळेतच घेण्यात यावी यासाठी पोलीस दलाच्या वतीने त्यांना वैद्यकीय अहवालानुसार होम क्वारंटाईन करण्यात आलं (Pune Corona Positive Cases) आहे.