पुणे : कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अपुरी पडणारी पुण्यातील स्मशानभूमींची संख्या वाढवण्यात आली आहे. दोन स्मशानभूमींवरील वाढता ताण लक्षात घेत ही संख्या नऊवर नेण्यात आली आहे. पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत जागा न मिळाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाला जाग आली. (Pune Crematoriums for COVID Patients increased)
पुण्यातील कोव्हिड रुग्णालयांनुसार स्मशानभूमीची व्यवस्था केली जाणार आहे. प्रत्येक स्मशानभूमीसाठी स्वतंत्र शववाहिकाही तैनात करण्यात आली आहे.
यापूर्वी केवळ कैलास आणि येरवडा स्मशानभूमीतच कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार केले जात होते. यापुढे या दोन स्मशानभूमींसह औंध, पाषाण, कात्रज, धनकवडी, मुंढवा, कोरेगाव पार्क, बिबवेवाडी या स्मशानभूमींमध्येही अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
कैलास आणि येरवडा स्मशानभूमीमध्ये 24 तास कोरोनाबाधित मृतांवर अंत्यविधी करता येणार आहेत. तर उर्वरित स्मशानभूमींमध्ये सकाळी 8 ते रात्री 12 या वेळेतच अंत्यसंस्कार होतील. यासोबतच कोरोनाव्यतिरीक्त अन्य मृतांचेही अंत्यसंस्कार पूर्वीप्रमाणेच 24 तास सुरु राहणार आहेत.
कैलास स्मशानभूमीत पुष्पकसह दोन शववाहिन्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ठरवून दिलेल्या रुग्णालयातील मृतदेह आणण्याची जबाबदारी चालकावर असेल. मृतदेहासाठी रुग्णवाहिका बोलावताना मृताचे नाव, डॉक्टरचे नाव आणि संपर्क क्रमांक देणे बंधनकारक असेल.
कोरोना संसर्ग झाल्यानंतर अॅम्ब्युलन्स आणि बेड वेळेत उपलब्ध न झाल्याने ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे निधन होऊन काही तास उलटत नाहीत, तोच पुण्यातील व्यवस्थेचे वाभाडे काढणारे आणखी एक उदाहरण समोर आले होते. पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय एकबोटे यांचे निधन झाले, त्यांच्याबाबतही बेड मिळण्यास दिरंगाई झाल्याचे दिसले. दुर्दैव म्हणजे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना स्मशानभूमीतही जागा मिळत नव्हती. (Pune Crematoriums for COVID Patients increased)
नेमकं काय घडलं?
दत्ता एकबोटे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक रुग्णालयांकडे विचारपूस केली गेली, मात्र बेड उपलब्ध होऊ शकला नाही. अखेर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ससूनमध्ये योग्य उपचार व्हावेत, यासाठी पुण्याचे खासदार गिरीश बापट, पालकमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यानंतर सुविधा मिळाल्या, परंतु तोपर्यंत एकबोटे यांची प्रकृती खालवली होती. मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार इतक्यावर थांबले नाहीत. एकबोटे यांच्या अंत्यसंस्कारातही अनेक अडचणी आल्या. आधी त्यांचे पार्थिव कैलास स्मशानभूमीत नेण्यात आले, मात्र तिथे जागा नसल्याने त्यांना येरवड्याला नेण्यात आलं. तिथून पुन्हा कोरेगाव पार्क स्मशानभूमीत नेऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 September 2020 https://t.co/qnKbF3CoDD
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 4, 2020
संबंधित बातम्या :
पांडुरंगनंतर पुण्याचे माजी महापौरही व्यवस्थेचे बळी, आधी बेड नाही, मग अंत्यसंस्कारांसाठी वणवण
पुणेकरांचा आवाज उठवणाराच कायमचा निघून गेला, पांडुरंग रायकरांसोबत काय-काय घडलं?
(Pune Crematoriums for COVID Patients increased)