पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या अंतिम निर्णयाची अनेकजण वाट पाहत आहेत. आधी राज्य सरकारने परीक्षांऐवजी श्रेणी पद्धतीचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला. मात्र, राज्यपालांनी तो निर्णय प्रलंबित ठेवल्याने सध्या संभ्रमाची स्थिती आहे. अशातच पुण्यातील शिक्षण संस्थांनी परीक्षा घ्या, सीईटी नको. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष पणाला लावू नका, अशी मागणी केली आहे (Pune Educational organisation demand exam amid corona). डेक्कन एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळ, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली.
संबंधित शिक्षण संस्थांनी म्हटलं आहे, “महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या नाही, तर या विद्यार्थ्यांवर कोरोना बॅचचा शिक्का बसेल. पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश त्याचबरोबर नोकरीमध्ये देखील अडचणी निर्माण होतील. विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा घ्याव्यात. विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा यंदा रद्द करुन पूर्वीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबवण्याची परवानगी द्यावी.”
यावेळी या शिक्षण संस्थांनी राज्य सरकारला कोणताही निर्णय घेताना शिक्षण संस्थांना विश्वासात घ्यावं, असं आवाहन केलं आहे. महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाला अनेक विद्यार्थी संघटनांचा पाठिंबा आहे, तर राज्यपाल, भाजप आणि काही संघटनांनी विरोध केला आहे. त्यातच आता पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांनीही परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. या संस्थांनी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या राहण्या खाण्याचा खर्च संस्था करण्याची तयारी दाखवली आहे. त्याचबरोबर सुरक्षित अंतर आणि अत्यावश्यक काळजी घेऊन परीक्षा घेण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असं चित्र असताना, पवारांनी राज्यपालांवर निशाणा साधला होता. “राज्यात अनेक शिक्षण संस्था आहेत. कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत. IIT ने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील ख्यातनाम अशा ऑक्सफोर्ड विद्यापीठ, अन्य चांगल्या विद्यापीठांनी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यपालांचे ज्ञान अर्थात आपल्यापेक्षा मोठं असेल”, असा घणाघात शरद पवारांनी केला. अगदीच कोणी काही चुकीचं केलं असा निष्कर्ष काढला असं मला वाटत नाही, असं पवार म्हणाले.
आरोग्य विज्ञानाचे (हेल्थ सायन्स) शिक्षण देणाऱ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. कुलपती म्हणजेच राज्यपालांनी पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा आराखड्याला होकार दिला. येत्या 15 जुलैपासून वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याची तयारी आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी याआधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन परीक्षेसाठी तयारी दर्शवली होती. लॉकडाऊनदरम्यान वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या. मात्र या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची तयारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने दाखवली आहे. राज्यपालांनी पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा आराखड्याला मंजुरी दिली.
संबंधित बातम्या :
Pune Educational organisation demand exam amid corona