पुणे : कोरोना संसर्ग झाल्यानंतर अॅम्ब्युलन्स आणि बेड वेळेत उपलब्ध न झाल्याने ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे निधन होऊन काही तास उलटत नाहीत, तोच पुण्यातील व्यवस्थेचे वाभाडे काढणारे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय एकबोटे यांचे निधन झाले, त्यांच्याबाबतही बेड मिळण्यास दिरंगाई झाल्याचे दिसत आहे. दुर्दैव म्हणजे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना स्मशानभूमीतही जागा मिळत नव्हती. (Pune Former Mayor Datta Ekbote Dies of Corona)
पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय उर्फ दत्ता गोविंद एकबोटे यांचे मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास कोरोनामुळे निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. विशेष म्हणजे एकबोटे यांच्या मोठ्या मुलीचे आणि मुलाचेही कोरोना संसर्गामुळे निधन झाले आहे.
दत्ता एकबोटे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक रुग्णालयांकडे विचारपूस केली गेली, मात्र बेड उपलब्ध होऊ शकला नाही. अखेर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ससूनमध्ये योग्य उपचार व्हावेत, यासाठी पुण्याचे खासदार गिरीश बापट, पालकमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यानंतर सुविधा मिळाल्या, परंतु तोपर्यंत एकबोटे यांची प्रकृती खालवली होती. मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार इतक्यावर थांबले नाहीत. एकबोटे यांच्या अंत्यसंस्कारातही अनेक अडचणी आल्या. आधी त्यांचे पार्थिव कैलास स्मशानभूमीत नेण्यात आले, मात्र तिथे जागा नसल्याने त्यांना येरवड्याला नेण्यात आलं. तिथून पुन्हा कोरेगाव पार्क स्मशानभूमीत नेऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्ताजी एकबोटे यांचे निधन झाले.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण एकबोटे परिवारासोबत आहोत.
— Supriya Sule (@supriya_sule) September 3, 2020
दत्ता एकबोटे यांनी समाजवादी पक्ष, जनता पक्षा आणि त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उपाध्यक्षपद भूषवले होते. गरीबांचे लढवय्या नेते अशी त्यांची ओळख होती. कष्टकऱ्यांसाठी संघर्ष करताना त्यांनी अनेकदा तुरुंगवासही भोगला. आणीबाणीच्या काळात त्यांना स्थानबद्धही करण्यात आले होते.
संबंधित बातम्या :
पुणेकरांचा आवाज उठवणाराच कायमचा निघून गेला, पांडुरंग रायकरांसोबत काय-काय घडलं?
(Pune Former Mayor Datta Ekbote Dies of Corona)