पुणे : गेल्या 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यात (Pune Rain) शुक्रवारपासून हजेरी लावली आहे. या पावसामुळे (Pune Rain) आळंदीमधील इंद्रायणी नदी (Indrayani River) दुथडी भरून वाहू लागली आहे. आंद्र आणि वडविळे धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने इंद्रायणी नदी दुथडी वाहू लागली. तर लोणावळ्यातही विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे भुशी डॅमकडे जाणारा मार्गही पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.
इंद्रायणी नदीचं रौद्र रुप
इंद्रायणी नदीच्या काठी असलेली लहान मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. भक्ती सोपान पूल हा पूर्णपणे पुराच्या पाण्यामध्ये गेला आहे. इंद्रायणी नदीकाठी पिंपरी चिंचवड पोलीस आणि आळंदी नगरपरिषद प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात केला आहे. इंद्रायणी नदी पात्रामध्ये कुणालाही जाण्याची परवानगी नाही. प्रशासनाने इंद्रायणी नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला.
मोई, चिंबळी, कुरुळी, चाकण MIDC या गावांना पिंपरी चिंचवड शहराशी जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. त्याचप्रमाणे इंद्रायणी नदी काठावरील निघोजे, मोई, कुरुळी, चिंबळी, मोशी, डूडुळगाव, केळगाव, आळंदी, सोळू, चऱ्होली, धानोरे, मरकळ, गोलेगाव आणि इतर काही गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुलावरील पाण्याचा धोका ओळखता या पुलावरील वाहतूक बंद करून ही वाहतूक दुसऱ्या पर्यायी मार्गाने वळवल्याने नागरिकांना काही प्रमाणत दिलासा मिळाला आहे.
लोणावळ्यात 24 तासात 375 मिमी पाऊस
लोणावळेकर झोपेत असताना मुसळधार मध्यरात्रीपासूनच पावसाने लोणावळा शहराला अक्षरशः झोडपून काढलं आहे. मागील 24 तासात शहरात तब्बल 375 मिमी पाऊस झाला आहे. यापैकी 300 मिमी पाऊस हा शुक्रवारची रात्र ते शनिवार पहाटेपर्यंत पडला.
मुसळधार पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झालंय. नांगरगाव येथील जाधव कॉलनी आणि विघ्नहर सोसायटीमध्ये पाणी शिरलं. वलवण नांगरगाव रस्ता, नांगरगाव ते भांगरवाडी रस्ता, मावळा पुतळा चौक, ट्रायोज मॉल समोरील रस्ता, बापदेव रोड, नारायणी धाम रस्ता पाण्याखाली गेला.Vo
पवना नदीला पूर
पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातील नद्या आणि नाले ओसंडून वाहत आहेत. थेरगावचा केजुबाई बंधारा पाण्याखाली गेला असून, चिंचवडच्या श्री मोरया गोसावी मंदिराच्या आवारात पाणी शिरलंय. दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात धुवांधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारं मावळातील पवना धरण 54 टक्के भरलं आहे.
बोरघाटात रेल्वे मार्गावर पुन्हा दरड कोसळली
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर मंकी हिल ते ठाकूरवाडी दरम्यान पुन्हा मोठ्या प्रमाणात दरड पडल्याने रेल्वेची वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे. लोणावळा, खंडाळा परिसरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने खंडाळा घाटात रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात दरड, माती आणि झाडं आल्याने रेल्वे मार्गाची मध्य आणि डाऊन लाईन बंद झाली. घाट परिसरातील धोकादायक दरडी काढण्याकरिता रेल्वेने 15 दिवस या मार्गावरील जवळपास 20 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.