पुणे : पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी शुक्रवार हा घातवार ठरला. गेल्या 24 तासात तब्बल सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सात रुग्णांपैकी सहा रुग्ण पुणे महापालिका हद्दीतील, तर एक रुग्ण हवेली तालुक्यातील होता. त्यामुळे पुण्यात कोरोनाबळींची संख्या 91 वर गेली आहे. (Pune Seven Corona Patients Death within 24 Hours)
पुणे शहरात काल रात्रीपासून सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले सर्व रुग्ण 65 ते 80 वर्षे वयोगटातील होते. सर्व मृत रुग्णांना आधीपासूनच अन्य व्याधीही होत्या. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 99 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात काल (गुरुवार 30 एप्रिल) दोघा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचं आज समोर आलं आहे, तर आजच्या दिवसात (शुक्रवार 1 मे) पाच जणांना प्राण गमवावे लागले. मृतांमध्ये पाच पुरुष, तर दोन महिलांचा समावेश होता. विविध हॉस्पिटलमध्ये हे रुग्ण उपचार घेत होते.
पुण्यातील नाना पेठेतील 68 वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या रुग्णाचा काल मृत्यू झाला. भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. तर हवेली तालुक्यातील माळवाडीच्या 80 वर्षीय महिलेला काल दुपारी पावणे बारा वाजता ससून रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण गमवावे लागले.
ताडीवाल परिसरातील 65 वर्षीय पुरुषाने आज सकाळी सव्वा सात वाजता अखेरचा श्वास घेतला. तर याच भागातील 71 वर्षीय महिलेचा आज साडेबारा वाजता कोरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेला कोरोनासह इतरही व्याधी होत्या.
सिम्बॉयसिस रुग्णालयात सिद्धार्थ नगरीतील 75 वर्षीय पुरुष रुग्णाची प्राणज्योत आज सकाळी साडेपाच वाजता मालवली. तर केईएम रुग्णालयात 51 वर्षीय पुरुषाचा सकाळी साडेआठ वाजता मृत्यू झाला. ते येरवडा परिसरातील रहिवासी होते. तर पर्वती दर्शन परिसरातील 75 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज सकाळी साडेदहा वाजता मृत्यू झाला.
तीन मेनंतर झोननुसार मोकळीक, कोणते जिल्हे कोणत्या झोनमध्ये? https://t.co/eC9AJWNrnl
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 1, 2020