आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात अस्थिरता आहे. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाला आहे. अशात छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. परवा दिवशी दुपारी छगन भुजबळ हे ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी छगन भुजबळ यांना पवारांच्या भेटीसाठी तासभर वाट पाहावी लागली. भुजबळांना तासभर ‘सिल्व्हर ओक’मध्ये का थांबावं लागलं? याबाबत शरद पवारांनी खुलासा केला आहे. भुजबळांसोबत काय बोलणं झालं? तसंच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण याबाबत शरद पवार यांची भूमिका काय आहे? हे देखील त्यांनी सांगितलं.
भुजबळांची दोन भाषणं छान झाली. त्या आधी ते बीडला गेले. बारामतीतही चांगले भाषण केलं. दोन्ही भाषणात माझ्याबद्दल आस्था आणि कौतुक व्यक्त केलं. त्यानंतर ते मला भेटायला आले. मला ताप होता. मी दोन दिवस सुट्टी काढली. मला सांगितलं भुजबळ साहेब आले. मला सांगितलं एक तासापासून आले. जायचंच नाही म्हणतात. त्यानंतर ते आले मला त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. या गोष्टी केल्या तर राज्याचं हित आहे असं ते म्हणाले. महाराष्ट्रातील वातावरण दुरुस्त करायचं असेल तर मी आलं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.
मी बैठकीला गेलो नाही. दोन कारणे होती. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांनी जरांगेचं उपोषण सुरू होतं. त्यांना भेटले. त्यांचा संवाद काय झाला माहीत नाही. त्यानंतर उपोषण सुटलं. त्यानंतर जरांगे पाटील यांची नवी मुंबईत एक संयुक्त कार्यक्रम पाहिला. याचा अर्थ काही तरी त्यांच्यात संवाद होता. तो आम्हाला माहीत नव्हता, असं शरद पवार यांनी म्हटलं.
भुजबळ म्हणाले, झालं गेलं सोडून द्या, मार्ग काढावा लागेल. नाहीतर महाराष्ट्रात वाद वाढतील. स्पष्ट सांगायचं म्हणजे या लोकांनी जी विधाने केली ती वाद वाढायला मदत करणारी होती. मार्ग काढायाचा असेल तर राज्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. राज्यकर्त्यांनी कितपत ही भूमिका घेतली माहीत नाही. तसं दिसलं नाही, असं पवारांनी यावेळी सांगितलं.