वर्ध्यात नव्या कैद्यांसाठी क्वारंटाईन कारागृहाची निर्मिती, 50 कैद्यांच्या राहण्याची सोय

| Updated on: Jun 13, 2020 | 7:29 PM

वर्धा प्रशासनाने येणाऱ्या कैद्यांसाठी क्वारंटाईन कारागृहाची निर्मिती केली जाणार आहे. यात 50 कैदी राहणार (Wardha Quarantine Center For Prisoners) आहेत.

वर्ध्यात नव्या कैद्यांसाठी क्वारंटाईन कारागृहाची निर्मिती, 50 कैद्यांच्या राहण्याची सोय
Follow us on

वर्धा : कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी कारागृहातील अनेक कैद्यांना सोडण्यात आले. तर दुसरीकडे नव्या कैद्यांची संख्या वाढतच आहे. नव्याने आलेल्या कैद्यांना थेट कारागृहात टाकणे शक्य नाही. त्यामुळे नियमानुसार त्या कैद्याची कोरोना चाचणी करुन त्याला 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवणं गरजेचे आहे. यासाठी वर्धा प्रशासनाने येणाऱ्या कैद्यांसाठी क्वारंटाईन कारागृहाची निर्मिती केली जाणार आहे. या क्वारंटाईन कारागृहात एकाच वेळी 50 कैदी राहणार आहेत. यात 25 महिला आणि 25 पुरुषांचा समावेश आहे. (Wardha Quarantine Center For Prisoners)

कैद्यांना क्वारंटाईन करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलातील दोन मोठ्या खोल्या वापरण्यात येणार आहे. तसेच याकरिता जिल्हा परिषदेच्या बंद असलेल्या शाळांचा वापर करण्याचा प्रयत्न आहे. या क्रीडा संकुलाच्या खोल्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. या खोल्यांच्या दुरुस्तीच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात कारागृहातील गर्दी टाळण्याकरिता शासनाच्या वतीने क्षमतेपेक्षा अधिक कैदींना सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वर्धा जिल्हा कारागृहातून आतापर्यंत 250 कैद्यांना सोडण्यात आले आहे.

तसेच नव्याने येणाऱ्या कैद्यांची कोरोना चाचणी करूनच त्याला कारागृहात परवानगी देण्याच्या सूचना आहेत. या सूचनेनुसार काम सुरु आहे. पण नव्या कैद्यांना कारागृहात विलगीकरणास जागाच नसल्याचे समोर आलं आहे. त्यानुसार, या क्वारंटाईन कारागृहाची संकल्पना समोर आली.

वर्धा जिल्हा कारागृहाच्या वतीने हा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी याची चौकशी करून तो प्रस्ताव मंजूर केला आहे. लवकरच या क्वारंटाईन कारागृहाच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मंजुरी देण्यात येणार असलेल्या खोल्यांची दुरुस्ती बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. कैद्यांसाठी या कोरोना काळात अशाप्रकारे क्वारंटाईन कारागृह निर्माण करणारा वर्धा जिल्हा हा विदर्भातील पहिलाच असल्याचे बोललं जात आहे.

वर्धा जिल्हा कारागृहात 252 कैद्यांची क्षमता आहे. पण या कारागृहात नेहमीच क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याचे पुढे आले आहे. कोरोना काळात कारागृहात असलेल्या काही कैद्यांना सोडण्याचे आदेश आले त्यावेळी 478 कैदी होते. सद्यस्थितीत या कारागृहात 230 कैदी आहेत. इतिहासात पहिल्यांदाच या कारागृहात क्षमतेपेक्षा कमी बंदी असल्याचा प्रकार घडल्याचं कारागृह व्यवस्थापकांकडून सांगण्यात येत आहे. (Wardha Quarantine Center For Prisoners)

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्रात खासगी लॅबमधील कोरोना चाचणीच्या दरात 50 टक्के कपात, नवी किंमत किती?

पेट्रोल-डिझेलवर वाढीव कर नको, सिगरेट-तंबाखूवर ‘कोरोना सेस’ आकारा : बाळा नांदगावकर