राज्यात एकीकडे 16 लाख पदासाठी पोलिस भरती प्रक्रीया सुरु असताना आता होमगार्डसाठी देखील भरती प्रक्रीया सुरु आहे. होमगार्डकरीता राज्यातून सुमारे 9 हजार 700 पदासाठी ही भरती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जळगाव जिल्ह्यात होमगार्डची 325 पदासाठी भरती प्रक्रीया सुरु झाली आहे. नोकरी नसल्याने लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने उच्च शिक्षित तरुणांनी देखील होमगार्डच्या भरतीसाठी अर्ज केल्याचे उघडकीस आले आहे.
शेती करणे हा आतबट्ट्याचा व्यवहार झाला आहे. त्यामुळे शेतकरी मुलांना कोणतीही मुलगी पसंद करीत नसल्याने आता सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यांकडे ग्रामीण भागातील तरुणांचा कल वाढत आहे. जळगावातील 325 होमगार्डच्या जागासाठी भरती प्रक्रीया सुरु आहे. पोलीस कवायत मैदानावर ही भरती सुरू असून शारीरिक तसेच मैदानी चाचणी पार पडत आहे. अवघ्या 325 जागांसाठी जवळपास 22 हजार पेक्षा जास्त उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. होमगार्ड पदासाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास अशी असताना या होमगार्ड भरतीसाठी पदवी, पदव्युत्तर असे उच्च शिक्षित तरुण सुद्धा सहभागी झाले आहेत.
नोकरी नसल्याने लग्नासाठी मुलगी मिळत नाही, त्यामुळे होमगार्ड का होईना त्यासाठी भरतीला आल्याचे तरुणांनी सांगितले.कुठली तरी शासकीय नोकरी मिळावी यासाठीच या भरती प्रक्रियेत सहभागी झाल्याचे आणि नोकरी मिळाल्यावर लग्न होईल अशी अपेक्षा तरुणांनी व्यक्त केली आहे. या नोकरीसाठी 20 ते 50 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहे. विशेष म्हणजे, जवळपास 6 वर्षांपूर्वी ही भरती करण्यात आली होती. 2018-19 या वर्षात होमगार्ड पदासाठी भरती करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील या होमगार्ड भरतीसाठी उमेदवारांना फिजिकल क्षमता परीक्षा द्याव्या लागणार आहे.