चंदिगड : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांत असंतोष आहे. काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या कायद्यांविरोधात आवाज उठवला असून, ते रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच काँग्रेस सत्तेत आल्यास हे तिन्ही कायदे आम्ही रद्द करु, अशी घोषणाही त्यांनी केली आहे. पंजाबमध्ये मोगा येथे काँग्रेसतर्फे ‘शेती वाचवा यात्रा’ काढण्यात आली होती. यावेळी शेतकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी वरील घोषणा केली. (Rahul Gandhi announced that Congress will repeal these three laws)
राहुल गांधी म्हणाले, “केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे शेतकरीविरोधी आहेत. केंद्र सरकारला तिन्ही कृषी विधेयके पारित करायचेच होते, तर त्यांनी या विधेयकांवर सांगोपांग चर्चा करायला हवी होती. लोकसभा आणि राज्यसभेत तपशीलवार चर्चा होणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही. ज्या दिवशी काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेत येईल, त्या दिवशी आम्ही हे तिन्ही कायदे रद्द करु. तसेच या काळ्या कायद्यांना कचऱ्यात फेकून देऊ.”
#WATCH: Punjab: CM Captain Amarinder Singh, Congress leader Rahul Gandhi, party’s state chief Sunil Jakhar take part in tractor yatra from Badhni Kalan to Jattpura as part of party’s ‘Kheti Bachao Yatra’. pic.twitter.com/TpXTpxcGCx
— ANI (@ANI) October 4, 2020
काँग्रेस पक्ष देशातील शेतकऱ्यांसोबत उभा
राहुल गांधी यांनी लताना काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत उभा असल्याची ग्वाही दिली. दिलेल्या आश्वासनांपासून काँग्रेस पक्ष तसूभरही मागे हटणार नसल्याचंही ते म्हणाले. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत, सरकार शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपासून वंचित ठेवत असल्याचा आरोपही केला. तसेच देशातली शेतीव्यवस्था भांडवलदारांच्या हातात देण्याचा घाट घातला जात असल्याचंही ते म्हणाले. सरकारने कितीही प्रयत्न केला तरी काँग्रेस शेतीव्यवस्था भांडवलदारांच्या घशात कधीही जाऊ देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी शेतकऱ्यांना दिले.
देशातील सरकार अडानी अंबानीचे सरकार
पुढे राहुल गांधी म्हणाले, की देशातील सरकार हे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चालतं, असं आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात हे सरकार नरेंद्र मोदी नाही, तर अडानी आणि अंबानी चालवतात. नरेंद्र मोदी अडानी, अंबानी यांच्यासाठी पूरक भूमिका घेतात, तर अडीनी अंबानी मोदींना समर्थन देतात.
दरम्यान, देशात कृषी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांत प्रचंड असंतोष आहे. तिन्ही कृषी कायदे तत्काळ रद्द करण्याची मागणी देशभरातून होत आहे. पंजाब, हरियाणा, महाराष्ट्रासारख्या राज्यात सरकारविरोधी निदर्शनं केली जात आहेत. केंद्र सरकारकडून हे तिन्ही कायदे शेतकरी हिताचे असून यातून शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचा दावा केला जातोय. तर काँग्रेसने ‘खेती बचाओ’ या अभियानाची सुरुवात केली असून त्यासाठी राहुल गांधी पंजाब दौऱ्यावर आहेत. तीन दिवसांच्या या अभियानाचे नेतृत्व स्वतः राहुल गांधी यांच्याकडे आहे.
संंबंधित बातम्या :
कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे ‘खेती बचाओ’ अभियान, राहुल गांधी ट्रॅक्टर चालवणार
Agriculture Bills | कृषी विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी, विरोधानंतरही रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी
(Rahul Gandhi announced that Congress will repeal these three laws)