राहुल गांधींचा एक फोन आणि ठरलं… महाराष्ट्रातील जागावाटपासंदर्भात लवकरच निर्णय होणार जाहीर

| Updated on: Feb 23, 2024 | 11:00 AM

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. येत्या काही काळातच निवडणुकांची तारीख जाहीर होईल. मात्र निवडणूक जवळ येऊन ठेपलेली असतानाही महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात अनेक संभ्रम दिसत आहेत. ही चर्चा सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते, उद्धव ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी त्यांची चर्चा झाल्याचे वृत्त आहे

राहुल गांधींचा एक फोन आणि ठरलं... महाराष्ट्रातील जागावाटपासंदर्भात लवकरच निर्णय होणार जाहीर
Follow us on

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 23 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. येत्या काही काळातच निवडणुकांची तारीख जाहीर होईल. मात्र निवडणूक जवळ येऊन ठेपलेली असतानाही महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात अनेक संभ्रम दिसत आहेत. ही चर्चा सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते, उद्धव ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी त्यांची चर्चा झाल्याचे वृत्त आहे. राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांशीही काल फोनवरून महाराष्ट्रातील जागावाटप संदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातील जागावाटप संदर्भात काही जागांवर अजूनही तिढा कायम असून, त्यावर अंतिम निर्णय लवकरच महाविकास आघाडीकडून घेतला जाणार आहे. त्याच संदर्भात राहुल गांधी, यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती आहे. त्याचा सकारात्मक परिणा लवकरच दिसून येईल. येत्या 27 आणि 28 (फेब्रुवारी) तारखेला महाविकास आघाडी लोकसभा जागावाटपसंदर्भात बैठक होणार आहे. त्या बैठकांमध्ये जागावाटपावर अंतिम निर्णय होईल, असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. लवकरच जागावाटपासंदर्भात घोषणा होईल.

22 फेब्रुवारीला बैठक होऊ शकली नाही

खरंतर, गेल्या काही काळापासून काँग्रेसला गळती लागली आहे. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण, यांसारखे बडे नेते काँग्रेसमधून बाहेर पडल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर विरोधी आघाडी महाविकास आघाडी (एमव्हीए) यांच्यातील जागावाटपाची चर्चा ठप्प झाली होती. यामुळे 22 फेब्रुवारीला मुंबईत होणारी बैठकही पुढे ढकलण्यात आली. पक्षातील काही ज्येष्ठ नेते 22 फेब्रुवारीला बाहेर असल्याने, त्या बैठकीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे बैठकीची तारीख पुढे ढकलण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 8 जागांवर चर्चा अडकली आहे. या जागांवर काँग्रेस आणि शिवसेना (UBT) दोन्ही पक्षांतर्फे दावा करण्यात येत आहेत. या जागांमध्ये रामटेक, हिंगोली, जालना, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण-मध्य, शिर्डी, भिवंडी आणि वर्धा यांचा समावेश आहे.

या पक्षांमध्ये सुरू आहे चर्चा

मात्र, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष, समाजवादी पक्ष आणि डावे पक्ष यासारख्या इतर पक्षांमध्येही जागावाटपाबाबत बोलणी सुरू आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे (व्हीबीए) प्रमुख प्रकाश आंबेडकरही महाविकास आघाडीवर नाराज आहेत. कोणत्याही मित्र पक्षात जागावाटपाबाबत एकमत होत नाही. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा निर्णय झाल्यावर आपला प्रस्ताव मांडू, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे गटाचा 23 जागांवर दावा

महाविकास आघाडीमध्ये अनेक जागांवरून फूट पडलेली असतानाच, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 23 जागांवर लढण्याचा दावा केला आहे. आम्ही राज्यातील 23 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहोत, ज्यामध्ये मुंबईतील चार जागांचा समावेश आहे, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. मित्रपक्षांसाठी फक्त दोन जागा उरल्या आहेत. पुढील बैठकीत एकमत होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.