कोझिकोड (केरळ) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 3 दिवसीय केरळ दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी कोझिकोड येथील आपल्या रोड शोच्या आधी 72 वर्षीय महिला नर्स राजम्मा वावथिल यांची भेट घेतली. राजम्मा राहुल गांधींच्या जन्मावेळी उपस्थित होत्या आणि त्यांनीच राहुल गांधींना पहिल्यांदा कुशीत घेतले होते.
रोडच्या शोच्या अगोदर राहुल गांधींनी घेतलेली ही भेट केरळमध्ये चांगलीच चर्चेचा विषय ठरली. राहुल गांधींच्या वायनाड येथील अधिकृत ट्विटर हँडलवरुन या भेटीचे फोटोही शेअर करण्यात आले. त्यानंतर अनेकजण भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले.
As CP @RahulGandhi‘s third day begins, he shares a light moment with Rajamma, a retired nurse present at the time of his birth.#RahulGandhiWayanad pic.twitter.com/MxvqYJEfRz
— Rahul Gandhi – Wayanad (@RGWayanadOffice) June 9, 2019
राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक अर्ज भरण्यासाठी जात होते तेव्हा राजम्मा यांनी राहुल गांधींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या नागरिकत्वावरुन वाद झाला तेव्हा राजम्मा यांनीही आपली भूमिका मांडत हा वाद व्हायला नको, असे म्हटले होते. तसेच 19 जून 1970 ला दिल्लीतील होली फॅमिली रुग्णालयात राहुल गांधींचा जन्म झाला तेव्हा आपण स्वतः रुग्णालयात हजर होतो, असे सांगत त्यांनी हा आक्षेप चुकीचा असल्याचे स्पष्ट केले होते.
दरम्यान, आज राहुल गांधींच्या 3 दिवसीय दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे. राहुल गांधी यांनी आपल्या कोझिकोड रोड शोमध्ये भाजप आणि पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली.