रायगड : रायगड जिल्ह्याला ‘निसर्ग’चक्रीवादळाचा नुकताच मोठा फटका बसला. जिल्ह्याबाहेरुन आलेल्या कोणाला होम क्वारंटाईन करावे आणि कोणाला करु नये? याबाबत रायगड जिल्हा प्रशासनाने सूचना जाहीर केल्या आहेत. शेतीच्या कामासाठी, घराच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी येणाऱ्या व्यक्तींना होम क्वारंटाईन होण्याची आवश्यकता नाही. (Raigad Home Quarantine Rules)
बाहेरुन निवासासाठी येणाऱ्या नागरिकांनी संबंधित राज्य शासन, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांची पूर्वपरवानगी घेऊन रायगड जिल्ह्यात येणे आवश्यक आहे. तसेच संबंधित जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांनी घोषित केलेल्या कोरोनाबाधित प्रतिबंधात्मक क्षेत्रांमधून (कंटेनमेंट झोन) नागरिकांना ये-जा करण्यास प्रतिबंध राहील.
रायगड जिल्ह्यातील जे नागरिक निवासासाठी येत नसून, शेतीच्या कामासाठी, घराच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी, शासकीय-खासगी कार्यालयांमध्ये रुजू होण्यासाठी, कंपनीच्या कामासाठी, वैद्यकीय उपचारांसाठी, औषध घेण्यासाठी, लग्न, मृत्यू इत्यादी कार्यासाठी येत असतील, त्या नागरिकांना होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्याची आवश्यकता नाही. अशा व्यक्तींमध्ये कोविड-19 ची लक्षणे आढळल्यास त्यांनी तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल होणे आवश्यक आहे.
जिल्ह्यामध्ये अधिक काळ रहिवासासाठी येणाऱ्या नागरिकांना 14 दिवस आवश्यकतेनुसार घरामध्ये किंवा संस्थात्मक विलगीकरण करणे आवश्यक आहे, तसेच संबंधित नागरिकांची कोविड-19 बाबतची प्राथमिक तपासणी करण्यात यावी. यामध्ये जर संबंधित व्यक्तीला कोविड-19 ची लक्षणे आढळली तर त्या व्यक्तीला तात्काळ शासकीय दवाखान्यामध्ये दाखल करावे. मात्र कोविड-19 ची लक्षणे नसल्यास त्या व्यक्तीने होम क्वारंटाईन व्हावे.
भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड- 19 बाधित रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना 14 दिवस क्वारंटाईन होणे आवश्यक आहे. कोविड-19 बाधित व्यक्तीला रुग्णालयामधून डिस्चार्ज दिल्यानंतर सात दिवस होम क्वारंटाईन करावे, कोविड-19 बाधित रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या हाय व लो रिस्क मधील व्यक्तीला भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार क्वारंटाईन करणे आवश्यक राहील. तसेच परदेशातून येणाऱ्या नागरिकांना सात दिवस हॉटेल, वा संस्थात्मक क्वारंटाईन व वैद्यकीय कोविड तपासणी निगेटिव्ह आल्यास सात दिवस होम क्वारंटाईन करणे आवश्यक राहील.
या व्यतिरिक्त शासनाने कोविड-19 बाबत प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी वेळोवेळी दिलेल्या सूचना बंधनकारक राहतील, असेही जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
VIDEO : टॉप 9 न्यूजhttps://t.co/taHDwJr81H
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 7, 2020