रायगड : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावापासून रायगड जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा महसूल प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा अहोरात्र युद्ध लढत आहेत. आता त्यांच्या मदतीला रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक विभागही या लढ्यात सहभागी झाला आहे. रायगड जिल्ह्यातील सुमारे 4 हजार मुख्याध्यापक आणि प्राथमिक शिक्षक कोरोना वॉरियर्सची भूमिका निभावत आहेत. (Raigad Teachers Corona Warriors)
रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. लॉकडाऊन संपून आपण आपल्या घरी जाऊ शकू, या आशेवर असणाऱ्या मुंबई व परिसरातील, परंतु मूळचे रायगड जिल्ह्यातील असलेल्या चाकरमान्यांच्या आशेवर पाणी पडले आहे.
दुकाने, हॉटेल, खाजगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरळीतपणे कधी सुरु होतील, याबाबत निश्चितता नाही. जवळ असलेला पैसा संपत चाललेला आहे. यावर उपाय म्हणून ‘गड्या आपला गाव बरा’ या भावनेने मुंबई व मुंबई परिसरातील नोकरी-कामानिमित्त राहत असलेल्या या चाकरमान्यांची पाऊले स्वाभाविकपणे गावाकडे वळली आहेत.
ज्यांना शक्य आहे त्यांनी जमेल ते वाहन घेऊन, ज्यांना शक्य नाही त्यांनी चालत आपले गाव गाठण्याचा संकल्प करुन ही चाकरमानी मंडळी गावाकडे निघाली आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारपाडा मार्गे प्रवेश करणाऱ्या या नागरिकांची व्यवस्थितपणे नोंद व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांच्या एकत्रित पुढाकारातून पेण तालुक्यातील खारपाडा, खोपोली, वरंध, पोलादपूर, कर्जत, ताम्हिणी येथे विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत.
मुंबई, ठाणे येथून चालत येणाऱ्या किंवा वाहनातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची या ठिकाणी नोंद घेतली जात आहे. त्यांची थर्मल स्कॅनरने तपासणीही केली जात आहे. संबंधित नागरिक कुठून आले आहेत, कुठे चालले आहेत, त्यांचा वाहन क्रमांक, मोबाईल क्रमांक अशी सर्व माहिती नोंदवून घेतली जात आहे. नोंद होणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारल्यानंतरच त्यांना येथून पुढे सोडण्यात येत आहे.
या मोहिमेसाठी या चेकपोस्टवर महसूल, पोलीस, आरोग्य यंत्रणेसोबत आता प्राथमिक शिक्षकदेखील कोविड योद्धा म्हणून या लढाईत उतरले आहेत. जिल्ह्याच्या सीमांवर असणारे चेकपोस्ट आणि प्रत्येक गावात आता या शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. खारपाडा, खोपोली, वरंध, पोलादपूर, कर्जत, ताम्हिणी चेकपोस्टवर हे शिक्षक सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत, दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत आणि रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत अशा तीन शिफ्टमध्ये आपली ड्युटी बजावत आहेत.
शिक्षकांकडून नोंदवल्या जाणाऱ्या माहितीमुळे जिल्हा प्रशासनाला दररोज जिल्ह्यात किती नागरिक नव्याने प्रवेश करत आहेत, याची खडा न् खडा माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे जिल्हयात आलेल्या या नागरिकांच्या व्यवस्थापनाबाबत योग्य ते निर्णय घेणे, उपाययोजना राबवणे, यासाठी प्रशासनाला या माहितीमुळे मोलाचे सहकार्य होत आहे. त्याचबरोबर ग्रामीण स्तरावर ज्या कोरोना नियंत्रण समिती कार्यान्वित करण्यात आल्या आहेत, त्या समित्यांमध्येही हे शिक्षक महत्वाची भूमिका बजावत आहेत.
VIDEO : राज्यात सलग चौथ्या दिवशी 2 हजारांहून अधिक रुग्ण https://t.co/oyr5iY2oMk
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 21, 2020