राजमाचीला ट्रेकर्सच्या मदतीची प्रतीक्षा, संपूर्ण गाव उद्ध्वस्त, एकाही घरात चूल पेटली नाही!

| Updated on: Jun 05, 2020 | 1:22 PM

राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या राजमाची (Rajmachi village affected due to Nisarga Cyclone) गावालाही निसर्ग वादळाचा मोठा तडाखा बसला.

राजमाचीला ट्रेकर्सच्या मदतीची प्रतीक्षा, संपूर्ण गाव उद्ध्वस्त, एकाही घरात चूल पेटली नाही!
Follow us on

पुणे : निसर्ग वादळाने कोकणचं जसं नुकसान केलंय, तसंच नुकसान पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांचं केलं आहे. राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या राजमाची (Rajmachi village affected due to Nisarga Cyclone) गावालाही निसर्ग वादळाचा मोठा तडाखा बसला. राजमाची गावातील 25 पैकी 20 घरांचे पत्रे उडून गेले आहेत. काही घरांच्या भिंतीही पडल्या आहेत. वादळ आलेल्या दिवशी म्हणजेच बुधवारी या गावात चूलच पेटू शकली नाही.

पावसाळ्यात ट्रेकर्सचं ओढा या राजमाची गावाकडे असतो. पर्यटकांचंही हे आवडतं ठिकाण आहे. मात्र आता याच राजमाची गावाला निसर्ग चक्रीवादळाने उध्वस्त केल्याने, त्यांना मदतीची गरज आहे. राजमाची गावाशेजारी वन्हाटी ठाकरवाडी आहे. इथल्या 16 घरांच्या वस्तीचीही दाणादाण उडाली.

पावसाळा सुरु झाल्याने राजमाची, वन्हाटी ठाकरवाडी इथल्या नागरिकांनी घरामध्ये धान्यसाठा करुन ठेवला होता. पाऊस आणि वार्‍यामुळे घरांचे पत्रे उडाल्याने घरांमध्ये पाणी साचले. त्यात हा धान्यसाठी भिजला. संपूर्ण गावात बुधवारी चूल पेटली नाही. जी काही चार पाच घरं या वादळात शिल्लक राहिली त्यांचा नागरिकांनी आसरा घेतला होता.

राजमाची गावाला जाण्याकरिता पक्का रस्ता नाही. त्यामुळे नागरिकांना घरे दुरुस्तीची कामे करताना आता अडचणी येत आहेत.

राजमाची गावाप्रमाणे वन्हाटी ही ठाकरवस्ती पूर्णपणे उडून गेली आहे. याठिकाणी असलेल्या 16 कुटुंबांचा संसार उध्वस्त झाला आहे. सरकारने तात्काळ या भागाचा पंचनामा करत त्यांना मदत करावी अन्यथा त्यांनी तात्पुरती दुसरीकडे राहण्याची सुविधा करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Rajmachi village affected due to Nisarga Cyclone)