मुंबई : ‘बेबी डॉल’ फेम बॉलिवूड गायिका कनिका कपूरला ‘कोरोना’ची लागण झाली आहे. कोरोनाची बाधा झाल्यानंतर कनिकाने आयोजित केलेल्या पार्टीला राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचे पुत्र खासदार दुष्यंत सिंहसुद्धा उपस्थित होते. त्यामुळे या मायलेकांनाही आता ‘क्वारंटाईन’ व्हावे लागत आहे. (Vasundhara Raje Home Quarantine)
कनिका कपूर 15 मार्च रोजी लंडनमध्ये होती. तिथून लखनौला परत आल्यावर तिने पार्टी आयोजित केली होती. पार्टीला वसुंधरा राजे आणि दुष्यंत सिंह यांच्यासह जवळपास 500 पाहुण्यांनी हजेरी लावली होती. कनिकाला ‘कोरोना’ची लागण झाल्याची बातमी समोर आल्यानंतर दुष्यंत आणि वसुंधरा यांनाही घरीच अलग ठेवल्याचे वृत्त आहे. आरोग्य विभागाला या 500 पाहुण्यांचाही शोध घ्यावा लागणार आहे.
काळजीत भर घालणारी बातमी म्हणजे पार्टीनंतर दुष्यंत सिंह सातत्याने लोकसभेतही उपस्थित राहिले होते. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित बैठकीतही दुष्यंत सिंह राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील खासदारांसह सहभागी झाले होते.
लखनौमध्ये ज्या चार जणांचा अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आला, त्यापैकी एक कनिका कपूरही आहे. कनिकाने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं.
Corona | ‘बेबी डॉल’ गायिका कनिका कपूरला कोरोना, विमानतळावरुन पळाल्याचा आरोपhttps://t.co/53i61DClU4#KanikaKapoor #CoronavirusOutbreakindia
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 20, 2020
विमानतळावर माझं थर्मल स्क्रीनिंग झालं होतं. मात्र, तेव्हा मला कोरोना झाल्याची लक्षणं नव्हती असा दावा तिने केला आहे. मात्र, कनिका विमानतळावरुन पळून गेल्याचा आरोप केला जात आहे. ‘आज तक’च्या बातमीनुसार, कनिका कपूर ही विमानतळावरील ग्राऊंड स्टाफच्या मदतीने बाथरुममध्ये लपली, त्यानंतर तिने पळ काढला, असं म्हटलं जातं.
कनिकाने 15 मार्चला लखनौमधील शालिमार गॅलंट अपार्टमेंटमध्ये एका पार्टीचं आयोजन केलं होतं. यामध्ये अनेक बडे अधिकारी आणि नेते मंडळी सहभागी झाले होते. कनिकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर संपूर्ण इमारतीत घबराट पसरली आहे. अगदी तिला कॅटरिंग सर्व्हिस पुरवलेले कर्मचारीही दहशतीखाली आहेत. कनिका कपूरचं संपूर्ण कुटुंब या इमारतीत राहातं. आता तिच्या कुटुंबालाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे. (Vasundhara Raje Home Quarantine)