नवी दिल्ली : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी आयएनएस विराट ही युद्धनौका सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी वापरली, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आणि एकच खळबळ माजली. याबाबत अनेक वृत्तांमध्ये विविध दावे करण्यात आले आहेत. पण नौदलाचे निवृत्त कमांडर व्हीके जेटली यांनी त्या घटनेचा आपण स्वतः साक्षीदार असल्याचं म्हटलंय. आयएनएस विराटचा अनेकदा सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी वापर झाला, पण आम्ही काहीही बोलू शकत नव्हतो, असं ते म्हणाले.
आयएनएस विराट लक्षद्वीपमधील बेटावर दहा दिवस उभी होती. राजीव गांधी त्यांच्या कुटुंबासह सुट्ट्या साजऱ्या करत होते. त्यांचे परदेशी पाहुणीही यावेळी उपस्थित होते. त्यांनी या युद्धनौकेचा वापर खाजगी टॅक्सीप्रमाणे केला, असा आरोप मोदींनी केला. तर काँग्रेसकडून हा आरोप फेटाळण्यात आलाय. तर नौदलाचे निवृत्त अडमायरल विनोद पासरिचा यांनीही आरोप फेटाळला. राजीव गांधी शासकीय दौऱ्यावर होते, असं पासरिचा म्हणाले आहेत.
नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांकडून मोदींच्या आरोपांचं समर्थन
दुसरीकडे नौदलाच्या आणखी एका निवृत्त अधिकाऱ्याने मोदींच्या वक्तव्याचं समर्थन केलंय. व्हीके जेटली यांच्या मते, गांधी कुटुंबाकडून सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी नौदलाची साधनं अनेकदा वापरण्यात आली. राजीव आणि सोनिया गांधींनी सुट्टया साजऱ्या करण्यासाठी बंगाराम बेटावर आयएनएस विराटचा वापर केला होता. नौदलाची साधने मोठ्या प्रमाणात वापरण्यात आली. मी स्वतः साक्षीदार आहे. माझी पोस्टिंग त्यावेळी आयएनएस विराटवर होती, असं निवृत्त कमांडर जेटली म्हणाले.
तुम्ही याला अधिकृत म्हणाला किंवा अनधिकृत दौरा म्हणा, ते मला माहित नाही. पण ते सुट्ट्यांसाठी लक्षद्वीपला गेले होते आणि त्यांनी आयएनएस विराटचा वापर केला, याबाबत कोणतंही दुमत नाही. ते जहाजावर होते, त्यांच्यासाठी अॅडमायरलची रुम तयार करण्यात आली होती. मला त्याबाबत शंभर टक्के खात्री आहे. त्यानंतर ते लक्षद्वीपला गेले.. पण ते अधिकृत दौऱ्यावर होते की वैयक्तिक ट्रिप होती हे आपण ठरवू शकत नाही, असं व्हीके जेटली यांनी ‘टाइम्स नाऊ’शी बोलताना सांगितलं.
“नौदलालाही ते पटलं नाही, पण आम्ही हतबल होतो”
नौदलाचे माजी अधिकारी हरिंदर सिक्का यांनीही मोदींच्या आरोपांचं समर्थन केलंय. गांधी कुटुंबाने सुट्ट्यांसाठी युद्धनौकेचा वापर करण्याचा नौदलातूनही विरोध करण्यात आला होता, असं ते म्हणाले. सिक्का हे सेहमत या पुस्तकाचे लेखक आहेत. राझी हा सिनेमा याच पुस्तकावर आधारित आहे.
आम्ही हतबल होतो. कारण, आम्ही काही बोलूही शकत नव्हतो, किंवा आक्षेप घेऊ शकत नव्हतो. त्यांनी आम्हाला विद्रोही ठरवलं असतं, असं सिक्का यांनी ‘टाइम्स नाऊ’शी बोलताना सांगितलं. पंतप्रधानांची जहाजावर उपस्थिती असण्याला आक्षेपाचं कारण नाही. पण सोनिया गांधींच्या उपस्थितीवर आक्षेप होता, असं ते म्हणाले.
परदेशी व्यक्तीही आयएनएस विराटमध्ये मोकाट फिरत होता. कंट्रोल रुमही सर्वांसाठी खुली करण्यात आली होती. नौदलाची साधनं सुट्ट्यांसाठी वापरली गेली. ते चुकीचंच होतं. आम्हालाही चिंता वाटत होती, पण अधिकारी म्हणून आम्ही काहीही करु शकत नव्हतो. पण आता आम्ही बोलू शकतो, असं सिक्का यांनी सांगितलं.
आयएनएस विराट नौदलाच्या ताफ्यात 1987 साली दाखल झाली होती. तर या युद्धनौकेचा वापर 2016 मध्ये बंद करण्यात आला. या ऐतिहासिक युद्धनौकेने 30 वर्ष देशाची सेवा केली.