नवी दिल्ली : काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय राजीव सातव यांनी काँग्रेस अंतर्गत नेतृत्व बदलावरुन सुरु असलेल्या घमासानावर भाष्य केलं आहे (Rajiv Satav on Congress leadership dispute). यावेळी त्यांनी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीतील चर्चेचीही माहिती दिली. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांना पत्राचा विषय संपवून पक्षाच्या संघटन स्तरावर जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती राजीव सातव यांनी दिली. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
राजीव सातव म्हणाले, “काँग्रेस पक्षाच्या सीडब्ल्यूसीच्या बैठकीत 23 नेत्यांच्या पत्रांवर संपूर्ण चर्चा झाली. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या पत्राचा विषय संपवा आणि संघटन स्तरावर जोमाने कामाला लागा असे आदेश दिले आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात लवकरच नवीन अध्यक्ष निवडण्याच्या तयारीला सुरुवात होणार आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राहुल गांधी यांना पुन्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी सोनिया गांधी यांनी पत्रांचा वाद संपवण्याचे आदेशही दिले.”
मुकुल वासनिक आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी जे पत्र लिहिले आहे त्याबाबत सोनिया गांधी यांनी आधी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मात्र हा वाद संपवण्याची विनंतीही केली. सामना वृत्तपत्रातून जी परखड भूमिका मांडली त्याबद्दल खासदार राजीव सातव यांनी सामनाचे आभार मानले.
दरम्यान, काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची (CWC) आज महत्त्वाची बैठक झाली (CWC Meeting). या बैठकीत सोनिया गांधीच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी राहणार असल्याचं निश्चित झालं. त्याचबरोबर पुढच्या 6 महिन्यांमध्ये पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिची सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेसची ही बैठक अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, नारायण स्वामी, भुपेश बघेल, कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सोनिया गांधी यांनी पक्षाची धुरा आपल्या हातात घ्यावी, अशी इच्छा व्यक्त केली. तर काहींनी राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्षपद सोपवण्यात यावं अशी मागणी केली.
पक्षाच्या पुनर्रचनेबाबत नेत्यांचं सोनिया गांधींना पत्र
काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत सोनिया गांधी यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचादेखील समावेश आहे. या सर्वांनी काँग्रेसमध्ये तळापासून मोठे बदल करत पक्षाला नवी उर्जा देण्याबाबत आग्रह धरला आहे. तसेच काँग्रेस पक्षांतर्गत कामाच्या काही पद्धतींवर आपली वेगळी मतंही मांडली आहे. त्यामुळे आता या पत्राचं पुढे काय होणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.
संबंधित बातम्या :
काँग्रेस नेत्यांनी भाजपला हाताशी धरुन पत्र लिहिल्याचे राहुल गांधी म्हणालेच नाहीत : गुलाम नबी आझाद
CWC Meeting | भाजपसोबत हातमिळवणीचे आरोप, राहुल गांधींवर भडकलेले कपिल सिब्बल पुन्हा शांत
संबंधित व्हिडीओ :