रायगड: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, असं म्हटलं आहे. ते खोपोलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं, मात्र सध्याचं आरक्षण कोर्टात टिकणार नाही, असं रामदास आठवले म्हणाले. खोपोली येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) रायगड जिल्हा युवक कार्यकर्ता वतीने घेण्यात आलेल्या मार्गदर्शन मेळाव्यानिमित्त रामदास आठवले उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल का याबाबत आठवले यांना विचारले असता, ते म्हणाले “आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. परंतु संसदेत एकूण 75 टक्के आरक्षणाचा कायदा केल्यास आरक्षणाचा मुद्दा सुटेल. आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे”
देशात मंदिर, पुतळे उभारले नाहीत तर मते मिळणार नाहीत. काँग्रेस आघाडीचे सरकार हे संविधानविरोधी होते, म्हणूनच ते गेले, असं आठवले म्हणाले. शिवाय भारिप -एमआयएम युती ही भाजपला फायदेशीर असल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला.
राम मंदिर होणे ही लाखो करोडो लोकांची इच्छा आहे, आमचीही आहे. वादग्रस्त जागेचा निकाल लागेपर्यंत थांबणे गरजेचे आहे. मात्र राममंदिर बांधताना मुस्लिम समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणेंही गरजेचे आहे. राम मंदिराची जागा ही पूर्वी बौद्ध धर्मियांची असून तेथे बुद्धविहार होते. मात्र सध्या वादग्रस्त जागा असल्याने त्याबदल्यात सरकारने बौद्ध धर्मियांना दुसरीकडे जागा द्यावी, अशी मागणी आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.
मंदिर, पुतळे बांधून विकास होणार का या प्रश्नावर आठवले यांनी मंदिर, पुतळे उभारले नाहीत तर मते मिळणार नाहीत अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली.