मुंबई : रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale Receives Award) यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. ‘इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड अँड लिडर्स अवॉर्ड’ (India’s Greatest Brand and Leaders Award) ने आठवलेंचा गौरव करण्यात आला आहे. खुद्द आठवलेंनीच ट्विटरवर फोटो जाहीर करत या पुरस्काराविषयी माहिती दिली आहे.
एशियन बिझनेस आणि सोशल फोरमचं बारावं अधिवेशन नुकतंच मुंबईतील वांद्रे परिसरातील ताज लँड एन्डमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. या अधिवेशनात रामदास आठवले यांचा ‘इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड अँड लिडर्स अवॉर्ड’ने सन्मान (Ramdas Athawale Receives Award) करण्यात आला. यावेळी जगभरातील उद्योजक आणि समाजसेवक उपस्थित होते.
‘इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड अँड लिडर्स अवॉर्ड’ने रामदास आठवले यांचा सन्मान झालेला असला, तरी त्यांचं नेमकं योगदान काय, हे गुलदस्त्यातच आहे.
युनायटेड अरब अमिरातीतील शारजाचे प्रसिद्ध उद्योगपती सौद सलीम अल मझरोकी, मुंबई स्टॉक एक्स्चेंजचे सीईओ आशिषकुमार चौहान, उद्योजक बी आर शेट्टी, विकासक निरंजन हिरानंदानी या मान्यवरांनाही रामदास आठवले यांच्या हस्ते गौरवण्यात आलं.
इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड अँड लिडर्स अवार्ड ने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सन्मानित pic.twitter.com/wKZGPnUnSv
— Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 18, 2019
रामदास आठवले येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करणार आहेत. ज्याच्या जास्त जागा त्याचाच मुख्यमंत्री होईल, असं भाकित रामदास आठवले यांनी वर्तवलं होतं. रिपाइंने घटकपक्षांसाठी 25 जागांची मागणी केली आहे. त्यापैकी किमान 10 जागा आपल्याला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
एकही जागा न लढवता मंत्रिपद
रामदास आठवले यांनी लोकसभेची एकही जागा लढवली नव्हती, तरीही त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं. त्यामुळे अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं होतं. मात्र, एकही खासदार नसताना केंद्रात मंत्रिपद कसं मिळालं, याचं गुपित स्वत: रामदास आठवले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना फोडलं होतं.
‘मंत्रिपद दुसऱ्यांना मिळण्याचे गुपित म्हणजे मी नरेंद्र मोदींच्या प्रत्येक सभेला उपस्थित होतो. मोदी म्हणायचे की, फडणवीस तुमच्यावर खुश आहेत आणि फडणवीस म्हणायचे की, मोदी तुमच्यावर खुश आहेत. मी म्हणायचो तुम्ही दोघे खुश तर मीही खुश’ असं सांगत आठवलेंनी मंत्रिपदाचा फॉर्म्युला उघड केला होता.
रामदास आठवले आपल्या हलक्या-फुलक्या शैलीतील कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. अगदी संसदेतही त्यांची शेरो-शायरी चालते. 1999 ते 2009 या काळात ते लोकसभेत खासदार होते. तर 2016 पासून ते राज्यसभेवर निवडून आले आहेत.