रत्नागिरी: प्लॅस्टिकबंदीनंतर आता महाराष्ट्रात रासायनिक खतांवर बंदी घालण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी त्याबाबतचे संकेत दिले. महाराष्ट्रात रासायनिक खतांवर बंदी आली तर तो मोठा निर्णय ठरेल. रामदास कदम यांनी गुहागरजवळच्या केळशी इथे याबाबतचं वक्तव्यं केले.
महाराष्ट्रात यापुढे रासायनिक खतांवर बंदी घालण्यात येणार असून, प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर घेतलेला हा फार मोठा क्रांतिकारी निर्णय असेल, असे रामदास कदम म्हणाले. राज्याच्या पर्यावरण विभागामार्फत राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत, उंबरशेत येथील गौरीच्या तळ्याचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन करताना त्यांनी ही माहिती दिली.
राज्यात 227 नगरपालिका आणि 27 महानगरपालिका आहेत. त्यांच्या हद्दीत जमा होणार्या कचर्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे. गायी, म्हैशी, गोठ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून शेतकर्यांकडून शेण विकत घेऊन, सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे. हे खत शेतकर्यांना 50 टक्के सवलतीत देण्यात येणार आहे, असं रामदास कदम म्हणाले.
“मला सगळी रासायनिक खतं बंद करायची आहेत. मी मोठा निर्णय घेतला आहे. कॅबिनेट बैठकीत मी याबाबत पाऊण तास बोललो. राज्यात 227 नगरपालिका आणि 27 महानगरपालिका आहेत. त्यांच्या हद्दीत जमा होणार्या कचर्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे. मी जसा प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला, जसा सीआरझेडचा निर्णय घेतला, तसा माझा तिसरा निर्णय असेल, रासायनिक खतं बंद झाली पाहिजेत.