REVIEW : जमतारा – सबका नंबर आएगा

| Updated on: Jan 22, 2020 | 11:03 PM

फिशिंगचे कॉल्स तुम्हा आम्हा सगळ्यांना कधी न कधी आलेले आहेत. आपल्यापैकी अनेकजण या फसवणुकीचे शिकारही झालेलो आहोत. पण, ही फिशिंग करणाऱ्या टोळीचे फोन कॉल्स झारखंडमधल्या अजिबात चर्चेत नसलेल्या जमतारामधून येत असतील आणि त्यातही फोन कॉल करून माहिती विचारणारी ही पोरं दहावीही पास नाहीत हे कळलं तर? त्यातही त्यांनी थोडीथोडकी नाही तर पाच-सहा वर्षांत कोट्यवधी रुपयांची अफरातफर केलीय. त्यावर जमतारा ही वेबसीरीज बेतलीय.

REVIEW :  जमतारा - सबका नंबर आएगा
Follow us on

मुंबई : हॅलो मी अमूक अमूक बँकेतून बोलतेय, तुमचं डेबिट कार्ड एक्सपायर्ड झालंय तुम्हाला ते सुरु ठेवायचंय का?

किंवा
हॅलो, तुमचं क्रेडिट कार्ड ब्लॉक झालंय, तुमचं ट्रँझॅक्शन सुरु ठेवायचंय का?
किंवा
तुमची बँक आधार आणि पॅन लिंक करायची आहे का?
असे फोन तुम्हा आम्हा सगळ्यांनाच आलेले आहेत.
किंवा
तुमच्या पेटीएमचा केवायसी एक्सपायर्ड झालाय पुन्हा रिएक्टिव्हेट करण्यासाठी या नंबरवर फोन करा असे मेसेजही आलेले आहेत. आपण आता अशा कॉल्स आणि मेसेजला बऱ्यापैकी यात सरावलोय, त्यामुळे सहसा आपण अशा ‘फिशिंग’ला बळी पडत नाही. पण, हे फिशिंगचे कॉल्स कुठून येतात आणि त्यांच्याकडे आपली सगळी माहिती कशी जाते याबाबत कधी विचार केलाय? यातले 90% कॉल्स हे झारखंडमधल्या जमतारा या जिल्ह्यातून आलेले आहेत, याच जमतारावर ही सीरीज बनली आहे.
अगदी दहावीही न शिकलेली पोरं एका फोनवरुन बँक डेबिट कार्डची महत्त्वाची माहिती अगदी सहज मिळवतात. अगदी सहज म्हणणं म्हणजे, बऱ्याचदा लालूच दाखवून किंवा घाबरवून. तुम्ही आमचे लकी कस्टमर आहात किंवा तुम्ही आमचे पन्नास हजारावे कस्टमर आहात किंवा तुमच्या कार्डला मारुती कार लागलीय किंवा तुम्हाला 50 हजारांची लॉटली लागलीय किंवा फॉरेन टूअर किंवा गोवा टूअरसाठी तुमचा नंबर सिलेक्ट झालाय. किंवा तुमचं कार्ड एक्सपायर झालंय त्याला सुरु ठेवायचं असेल तर तुमच्या डेबिट कार्डची ही माहिती द्या, किंवा तुमच्या कार्डवरुन इतके पैसे काढले गेलेत ते ट्रँझॅक्शन तुम्हीच केलंय का ते केलं नसेल तर आम्ही ते पैसे परत मिळवून देतो तुमच्या कार्डची माहिती द्या वगैरे वगैरे. अशी कारणं दाखवून ते डेबिट कार्डची माहिती मिळवतात.
थोडक्यात काय तर भीती आणि लोभ हेच या फिशिंग करणाऱ्यांची दोन मोठी हत्यारं आणि ते त्याचा बेमालूमपणे वापर करतात.
जमतारा सीरीजची स्टोरी
‘जमतारा – सबका नंबर आएगा’ ही नेटफ्लिक्सवरची वेबसीरीज याच जमतारा जिल्ह्यातल्या फिशिंगवर आधारित आहे. जमतारा जिल्ह्यातल्या करमतार गावात दोन चुलत भाऊ आहेत, सनी मंडल आणि रॉकी. सनीला फिशिंगमधून भरपूर पैसे कमवून मोठं व्हायचंय तर त्याचा भाऊ रॉकीला पैसे कमावून राजकारणात नाव कमवायचंय. त्यासाठी रॉकी तिथला स्थानिक आमदाराच्या नादी लागतो त्या आमदाराला यांचा फिशिंगचा धंदा समजतो आणि तो त्या दोन्ही भावांना आपल्यासाठी काम करायला सांगतो पण, त्यासाठी सनी तयार होत नाही, त्यातून दोन्ही भावांमध्ये वितुष्ट, आमदाराची दादागिरी, करमतारा गावातल्या प्रत्येक पोराचं फिशिंगचं आपापलं तंत्र आहे.
ही फिशिंग कशी होते आणि अगदी सामान्यांपासून ते जज, नेते मंडळींनाही ते कसं सहज फसवतात हे सगळं जमतारामध्ये पाहायला मिळतं. या पोरांच्या मोडस ऑपरेंडीबाबत बऱ्यापैकी माहिती जमतारा या सीरीजमध्ये मिळते. झारखंडमधल्या जमतारा या जिल्ह्यात प्रत्येकजण फिशिंगच्या धंद्यात आहे. गावात काहीही नसलं तरी पोरांकडे नव्या कोऱ्या बाईक आणि रात्री पार्टी करायला पुरेशी दारु उपलब्ध आहे.
अभिनयात पैकीच्या पैकी मार्क्स!
या सीरीजमध्ये मेन लीडपासून ते छोटा-मोठा रोल करणारी सगळी पोरं ही नवखी आहेत पण त्यांचा अभिनय कुठेही नवखा वाटत नाही. सनीच्या भूमिकेतला स्पर्श श्रीवास्तव, रॉकीच्या भूमिकेतला अंशुमन पुष्कर, गुडिया सिंहच्या भूमिकेतली मराठमोळी मोनिका पवार, एसपीच्या भूमिकेतली मुंबईची अक्षा पर्दासानी या सगळ्यांनी आपापल्या भूमिका चोख केल्यात. झारखंड आणि बिहारचं बेअरिंग प्रत्येकानं अगदी व्यवस्थित पकडलंय. बाहुबली आमदाराच्या भूमिकेत अमित सियाल भूमिकेत अगदी बेमालूम फिट झालाय.
जमतारा का पहावं?
बहुतांशवेळा बँकांकडून आणि इतर पद्धतीनं सांगूनही आपण या फिशिंगला बळी पडून आपली सगळी महत्वाची माहिती या जमतारातल्या पोरांसमोर सांगून मोकळे होतो. त्या सगळ्यांसाठी ही सीरीज पाहणं खरंच आवश्यक आहे, त्यामुळे आपली माहिती कुठे लपवून ठेवायची आणि कोणासमोर उघड करायची नाही याची चांगली उजळणी या सीरीजमधून होईल.
जमतारा सीरीजमध्ये काय कमी राहिली?
जमतारा सीरीजमध्ये फिशिंगचं वरवरचं दाखवलंय, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं अनुत्तरीत राहतात, जसे की या पोरांकडे आपले मोबाईल नंबर्स आणि आपल्या बँक आणि कार्डबाबत माहिती कशी पोहोचते. या पोरांना हे स्कॅम करायला कुणी आणि कसं शिकवलं. पैसे ग्राहकाच्या खात्यातून  उडवल्यानंतर ते या पोरांपर्यंत कसे पोहोचतात, त्यामध्ये जो सोर्स वापरला जातो त्याचं कमिशन आणि या पोरांचा फायदा हे सगळं अजून उलगडून दाखवता आलं असतं. पण, ते बरंच वरवरचं झालंय. त्यातही या पोरांनी कोट्यवधी रुपयांची अफरातफर होईपर्यंत कुठल्याच तपास यंत्रणेला खबर कशी काय लागली नाही, त्यातही सायबर क्राईमच्या बाबतीत आपण इतके सतर्क झालेले असताना, हे जरा पचायला अवघड जातं.
बऱ्याचदा असं वाटून जातं कि, ही सीरीज अनुराग कश्यपनं हातात घेतली असती तर कदाचित त्यानं रिसर्चवर इतका वेळ आणि खर्च केला असता की ही सीरीज खरंच अथपासून इतिपर्यंत पाहिल्याचा अनुभव आला असता.
मात्र, सौमेंद्र पाढीनं त्यातल्या त्यात बऱ्यापैकी जमवून आणलंय मात्र, नंतर नंतर ही सीरीज फिशिंग कमी आणि गावातलं राजकारण, पोरापोरांमधले मतभेद-हाणामारी यातच इतकी अडकून पडते की तिची मूळ गाभाच हरवून जातो. त्यामुळे त्यात काहीतरी कमी राहिलंय असं वाटत राहतं.
जमताराचा इतिहास
2019मध्ये जमतारामधून शंभरहून अधिक जणांना या फिशिंगच्या गुन्ह्यात अटक केली गेली. त्यांच्याकडून 224 मोबाईल फोन जप्त केले गेले. 354 सीम कार्ड्स, 163 एटीएम कार्ड्स, विविध बँकांचे 83 पासबूक, 23 चेकबूक, 30 मोटारसायकली  आणि 12 कार जप्त करण्यात आल्या.
करमतार गावातच काय तर अगदी जमतारा जिल्ह्यातही सांगण्यासारखं मोठं काहीही नाही, तरीही जमतारा जिल्हा हा फिशिंग करणाऱ्यांचं ‘हब’ म्हणून कुप्रसिद्ध झाला. करमतार गावात अठराविश्व दारिद्र्य दिसत असलं रोजगाराच्या कसल्याही सुविधा नसल्या, अर्ध्याहून अधिक गाव सकाळच्या रेल्वेनं कोलकत्यात जाऊन काम करून रात्रीच्या गाडीनं परत येत असलं तरी काही जणांनी ऐंशी-नव्वद लाखांची मोठं-मोठी घरं बांधलेली आहेत. अगदी भारीतलं भारी ग्रेनाईट आणि संगमरवर या घरांसाठी वापरलं गेलंय. हे सगळं कुठून आलं तर फिशिंगच्या पैशांतून. अख्खा जमतारा जिल्हा देशपातळीवर फिशिंगसाठी कुप्रसिद्ध झालाय. त्यामुळे बहुतांश पोरं आता गावातून बाहेर जाऊन अशा ठिकाणांहून फोन करतात कि जिथून पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा लागू नये. आणि ठावठिकाणा लागेपर्यंत ते परत आपल्या मूळ घरी पोहोचलेले असतात.
ता. क. 
जरा आठवून पहा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर गेल्या आठवडाभरात कुठे कुठे दिलाय. मॉलमधल्या लकी ड्रॉसाठी, एखाद्या बिल्डिंगमध्ये एंट्री करताना रजिस्टरवर, ऑनलाईन शॉपिंग करताना की अजून कुठे. नेमके याच ठिकाणाहून हे मोबाईल नंबर मिळवले जातात. तेव्हा अशा ठिकाणी नंबर देताना जरा सांभाळून!
महत्त्वाचं :
बँक कधीही कुठलीही माहिती विचारण्यासाठी तुम्हाला फोन करत नाही आणि केला जरी तरी तुम्हाला तुमच्या बँकेच्या डेबिट कार्डबाबत कसलीही माहिती विचारत नाही, तेव्हा पुन्हा असा कॉल आला तर समजून जा की हा कॉल गँग्स ऑफ जमताराकडून आलाय.