हिंगोली : पूर्वी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणच्या प्रवासासाठी प्राण्यांचा वापर केला जायचा. आता अत्याधुनिक वाहने आपल्या दिमतीला आलीत. तरीही अपघाताच्या भीतीपोटी काहींना तोच जुना प्राण्यांवरून केला जाणारा प्रवास जास्त सुरक्षित वाटतो. हिंगोलीतील एक आजोबा असेच चर्चेचा विषय बनले आहेत.
अपघाताच्या भीतीपोटी हिंगोली जिल्ह्यामधल्या सेनगाव तालुक्यातील आजी गावच्या भिकाजी गोरे यांनी वाहनाऐवजी घोड्यावरून प्रवास करण्याची ही नामी युक्ती लढवली आहे. दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण वाढलंय. या अपघातांमध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतो. हे जीव वाचवण्यासाठी आजोबांची ही अनोखी शक्कल आहे.
मध्यंतरीच्या काळात पुण्यात फ्लेक्स पडल्यामुळे एक वयोवृद्ध आजोबा ऑटोमध्ये हेल्मेट घालून प्रवास करत असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. खरं तर गोरे काकांना बालपणापासूनच पशुपालनाचा छंद होता, जो त्यांनी वयाच्या साठीपर्यंत जपलाय. सध्या त्यांच्याकडे 10 घोडे आहेत आणि बैलांच्या जोड्या देखील आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, घोड्यावरून प्रवास केल्याने शारीरिक व्यायाम होतो आणि अपघातापासूनच बचावही होतो.
गोरे आजोबांच्या या जगावेगळ्या कामगिरीची चर्चा अगदी जिल्हाभरात ऐकायला मिळते. या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत आपणही अशी घोडेस्वारी केल्यास नक्कीच प्रदूषण टाळण्यास आपलाही हातभार लागेल इतकं मात्र खरं.
पाहा व्हिडीओ :
#हिंगोली : अपघाताच्या भीतीपोटी आजही घोड्यावरुन प्रवास करणारे आजोबा pic.twitter.com/1Y9mmE38mp
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 21, 2018