धुळे : साक्री शहरात चोरांनी तब्बल तीन लाखाचा ऐवज लंपास केला आहे (Robbery In Sakri). साक्री शहरातील पोळा चौक परिसरातील रहिवासी दिनेश साळुखे यांच्या घराच्या दरवाजाच्या कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 3 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी धुळे येथील श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पथकाच्या माध्यमातून परिसरात चोरट्यांचा माग काढण्यात आला (Robbery In Sakri).
शहरातील पोळा चौक परिसरात राहणारे दिनेश बापूराव साळुखे आईसह त्यांच्या वडिलोपार्जित घरात राहतात. त्यांचे मोठे भाऊ महेश साळुखे हे नाशिक येथील एकलहरे येथे नोकरी करतात. त्यांना मुलगा झाल्याने दिनेश साळुखे आई त्रिवेणीबाई साळुखे यांच्यासह 17 ऑगस्टला नाशिक येथे गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारला.
साळुखे यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती त्यांना मंगळवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास त्यांचे नातेवाईक राजेंद्र दिगंबर भामरे यांनी दिली. त्यानंतर दिनेश साळुखे आणि त्यांचे मोठे बंधू महेश साळुखे नाशिकहून साक्री येथे आले. त्यानंतर त्यांनी घरात पाहणी केली असता हॉल, बेडरुम आणि किचनमधील सर्व साहित्य अस्ताव्यस्त विखुरलेले आढळून आले. तसेच, बेडरुममधील लोखंडी कपाटाचे कुलूप तुटले होते.
कपाटामध्ये ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने गहाळ झाल्याचे दिसून आले. त्यामध्ये 1 लाख 50 रुपये रोख आणि 45 हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या, 30 हजार रुपयांच्या पाच ग्रॅमच्या 2 सोन्याच्या चेन, 90 हजार रुपयांचे कानातील सोन्याचे 6 टोंगल (कर्णफुले), 9 हजार रुपयांच्या सोन्याच्या कानातील 2 रिंगा, 12 हजार रुपयांच्या अर्धा ग्रॅमच्या 8 सोन्याच्या अंगठ्या, 1 हजार रुपयांच्या 2 भार चांदीच्या चेन, 5 हजार रुपयांचे 10 भार चांदीचे दहा शिक्के, असा एकूण 3 लाख 42 हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. पोलीस पथकाच्या माध्यमातून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. या प्रकरणी दिनेश साळुखे यांनी साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सोनसाखळी चोरांचा सिनेस्टाईल पाठलाग, नाशकात सुट्टीवरील पोलिसाची पत्नीसह धडाकेबाज कामगिरीhttps://t.co/DOYnwm4FgG #Nashik
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 14, 2020
Robbery In Sakri
संबंधित बातम्या :
मुंबई क्राईम ब्रँचकडून दोन कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, एकाला अटक
कोल्हापुरात मोबाईलचं दुकान फोडलं, साडे 16 लाखांचा मुद्देमाल लंपास