औरंगाबाद : औरंगाबादमध्ये थोडेथोडके नव्हे तर तब्बल 58 किलो सोने चोरीला गेले आहेत. वामन हरी पेठे ज्वेलर्समधून 27 कोटी रुपयांचे 58 किलो सोने चोरीला गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ज्वेलर्सचा मॅनेजर आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्धा क्विंटलपपेक्षा अधिक सोने चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादच्या समर्थनगर परिसरातील वामन हरी पेठे शाखेतून हे सोने चोरीला गेले आहे.
समर्थनगर भागातील वामन हरी पेठे ज्वेलर्समध्ये मॅनेजरनेच इतर तीन साथीदाराच्या मदतीने 27 कोटी 31 लाख रुपयांचे 58 किलो सोने लंपास केले. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अंकुर राणे, राजेंद्र जैन, लोकेश जैन आणि एक महिला (सर्व राहणार औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत.
समर्थनगर भागातील पेठे ज्वेलर्समध्ये अंकुर राणे हा मॅनेजर पदावर कार्यरत होता. दुकानाची सर्व जबाबदारी विश्वासाने राणेवर सोपविण्यात आली होती. दुकानातील सोने हिरे दागदागिन्यांची विक्री आणि व्यवहार राणेच सांभाळत होता. मागील सहा महिन्यांपासून दुकानातील व्यवहारात अनियमितता आढळून आली.
याबाबत ऑडीट केली असता गैरव्यवहार समोर आला. त्यानंतर पेठे जेवलेर्सचे मालक विश्वनाथ प्रकाश पेठे (रा.मुंबई) यांना याबाबत माहिती मिळाली असता, त्यांनी शहानिशा केली आणि 58 किलो सोने लंपास असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पेठे यांच्या तक्रारी वरून क्रांतीचौक पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सूत्र हलवत अंकुर राणे ,राजेंद्र जैन, लोकेश जैन यांना अटक केली आहे.