जळगाव : “गेल्या दोन दिवसांपासून आमच्या पाठीराख्यांचं आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं एवढं प्रेम आम्हाला मिळतंय. महाराष्ट्रभरातून असंख्य फोन येतायेत की आपण घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्यामुळे पक्षप्रवेशानंतर एक वेगळी भावना झालेली आहे. येत्या काळात आम्ही राष्ट्रवादी बळकट करु”, असा निर्धार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी बोलून दाखवला आहे. (Rohini Khadase on Eknath Khadase and NCP)
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधल्यानंतर ते पहिल्यांदाच जळगावात गेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचं सर्व कुटुंब देखील उपस्थित आहे. “राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जशी आमच्या पक्षप्रवेशाची घोषणा केलीये तसा एक वेगळा उत्साह संचारला आहे. येत्या काळात आम्ही पूर्ण ताकदीनिशी राष्ट्रवादीचं काम करु आणि संघटनावाढीसाठी प्रयत्न करु”, असं रोहिणी खडसे म्हणाल्या.
एकनाथ खडसेंवर झालेल्या अन्यायामुळे आम्हाला कुटुंब म्हणून त्रास झाला, असं सांगताना आता यापुढच्या काळात राष्ट्रवादीचं मोठं काम आम्ही उभा करु, असा निर्धार यावेळी रोहिणी खडसे यांनी बोलून दाखवला.
“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ठिकठिकाणी आमचं स्वागत करण्यात आले. मुंबईपासून जळगावला येईपर्यंत प्रत्येक 10 कि.मी. अंतरावर कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या स्वागताला उभे होते. पक्ष सोडल्यापासून आमचे कार्यकर्ते तसंच नव्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी आनंदात आहेत. राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे आमचं स्वागत केलं त्यांच्या आम्ही ऋणात राहू इच्छितो”, असं त्या म्हणाल्या.
दुसरीकडे मी अजूनही भाजपमध्ये असतो तर वाजपेयी-अडवाणींसारखी माझी अवस्था झाली असती, अशी उद्विग्न प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पक्षात माझ्यावर मोठा अन्याय सुरु होता. तिथल्या काही प्रवृत्तींनी जाणून बुजून मला टार्गेट केलं. सगळ्यात जास्त देवेंद्र फडणवीसांनी मला त्रास दिला, ही माझी भावना आहे. मला खेदाने सांगावंस वाटतं की मी आणखीही भाजपमध्ये असतो तर माझी अवस्था वाजपेयी-अडवाणींसारखी झाली असती”, असं खडसे म्हणाले.
पवारांनी प्रवेश दिला नसता तर माझे राजकीय जीवन थांबले असते- खडसे
“वाजपेयी-अडवाणी एवढे जेष्ठ नेते असून देखील त्यांची पक्षात अशी अवस्था झाली तर मग आपलं काय होणार होतं? हा सगळा एकंदरित विचार करुनच मी पक्षांतराचा निर्णय घेतला. मी यानिमित्ताने शरद पवारांचे आभार मानतो की त्यांनी मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला. त्यांनी जर प्रवेश दिला नसता तर माझे राजकीय जीवन थांबले असते”, असं खडसे म्हणाले. (Rohini Khadase on Eknath Khadase and NCP)
संबंधित बातम्या
भाजपमध्ये असतो तर वाजपेयी-अडवाणींसारखी माझी अवस्था झाली असती : एकनाथ खडसे
भाजप खासदार असलेल्या सुनबाईंनी केलं राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंचं स्वागत