परराज्यातून घरी जाणाऱ्या मजुरांकडून तिकिटांच्या पैशाची वसुली ही गरिबांची घोर चेष्टा : रोहित पवार

| Updated on: May 03, 2020 | 9:30 PM

रोहित पवार यांनी लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी पोहचवताना होणाऱ्या तिकिटाच्या पैशांच्या वसुलीवरुन केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे (Rohit Pawar on Ticket charges by labour amid lockdown).

परराज्यातून घरी जाणाऱ्या मजुरांकडून तिकिटांच्या पैशाची वसुली ही गरिबांची घोर चेष्टा : रोहित पवार
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी पोहचवताना होणाऱ्या तिकिटाच्या पैशांच्या वसुलीवरुन केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे (Rohit Pawar on Ticket charges by labour amid lockdown). पोटाची खळगी भरण्यासाठी जे मजूर परराज्यात जातात त्यांना आता लॉकडाऊनच्या काळात दिवस कसा भागवायचा अशी भ्रांत आहे. अशा मजुरांकडून तिकिटाचे पैसे वसूल केले जात आहेत ही गरिबांची घोर चेष्टा असल्याचं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं. याबाबत ट्विट करत त्यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाला प्रश्न विचारला आहे.

रोहित पवार म्हणाले, “पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यात गेलेल्या मजूरांकडून रेल्वे तिकिटाचे पैसे वसूल करणे म्हणजे गरिबांची घोर चेष्टा आहे. दिवस कसा भागवायचा याची भ्रांत असताना त्यांच्याकडून तिकिटाचे पैसे घ्यायचे हा कोणता न्याय? केंद्र सरकारने या मजूरांना आपापल्या राज्यात मोफत सोडण्याची व्यवस्था करावी.”


रोहित पवार यांनी परराज्यातील नागरिकांसोबतच पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबतही काळजी व्यक्त केली. “रेड झोन असलेल्या पुण्यात अडकलेल्या मुलांचे जेवणाचे प्रचंड हाल होत आहेत. त्यांना प्रशासनाने आवश्यक ती मदत करावी आणि कोटा येथील मुलांप्रमाणेच पुण्यात अडकलेल्या या मुलांनाही घरी जाण्यास तातडीने परवानगी द्यावी. यानंतर त्यांना काही दिवस तालुका/जिल्हा पातळीवर इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन करण्याची गरज आहे. याबाबत सरकार आपली जबाबदारी पार पाडेलच, पण या मुलांच्या जिवावर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा धंदा करणारे खासगी क्लासचालक मुलांना असे वाऱ्यावर सोडून शांत कसे झोपू शकतात? त्यांच्या या आत्मकेंद्री वृत्तीवर मी प्रचंड नाराज आहे, पण अजूनही वेळ गेलेली नाहीय,” असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.


“लोकांच्या हसण्यावर रागावण्यापेक्षा हास्यास्पद वर्तन थांबवा”

आपल्या अन्य एका ट्विटमध्ये रोहित पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.

ते म्हणाले, “लोक हसतात म्हणून विरोधी पक्षाचे नेते पोलीस आयुक्तांना भेटल्याची बातमी वाचून मलाच हसू आवरेना. या नेत्यांना मला सांगायचंय, लोकांच्या हसण्यावर रागावण्यापेक्षा हास्यास्पद वर्तन थांबवा आणि राज्याच्या हितासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यास सरकारला सहकार्य करा.


आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्राच्या मुद्द्यावरुनही रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली. रोहित पवार म्हणाले, “देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राचे (IFSC) मुख्यालय गुजरातला (गांधीनगर) हलवण्याचा निर्णय महाराष्ट्रासाठी नुकसानकारक आहे. आता राज्यावर प्रेम असणाऱ्या सर्वांनीच राजकीय जोडे बाजूला काढून हे केंद्र महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करावा. पण फक्त पक्षीय राजकारण करणाऱ्या काही नेत्यांची वक्तव्ये पाहता त्यांना या निर्णयाचा आनंदच झाल्यासारखा वाटतो. IFSC हे नांव गांधीनगरला नेलं असलं तरी त्याचा ‘अर्थ’ मुंबईतच राहणार आहे. PM care फंडासोबत CM फंडाचं नाव घेणं विसरणाऱ्यांना हे कधी कळणार?”

संबंधित बातम्या :

Navi Mumbai Corona : नवी मुंबईत एकाच दिवसात 25 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 300 पार

फोटो मॉर्फ करुन खालच्या पातळीवरील टीका करणाऱ्यांना पैसे कोणी पुरवले? जयंत पाटलांचा भाजपला सवाल

‘नागरिकांना रुग्णालयात बेड नाहीत, दुसरीकडे जा म्हणून सांगितलं जातंय’, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यात जीवनावश्यक नसलेल्या दुकानांना सशर्त परवानगी, मुंबई-पुण्यातील निर्बंध कायम

Rohit Pawar on Ticket charges by labour amid lockdown