मुंबई : अभिनेता सैफ अली खानने (Saif Ali Khan) पद्मश्री पुरस्कार (padma shri award) परत करण्याबाबत वक्तव्य केलं आहे. सैफ अली खान अभिनेता अरबाज खानच्या टॉक शोमध्ये सहभागी झाला होता. या शोच्या नियमानुसार यजमानाने स्वत:विरोधात ट्रोलर्सने केलेले मेसेज स्वत: वाचायचे असतात. एका ट्रोलरच्या मेसेजमुळे हतबल झालेल्या सैफ अली खानने थेट पद्मश्री पुरस्कार परत करण्याची इच्छा बोलून दाखवली.
ट्रोलर्सचा मेसेज
सैफला वाचण्यास दिलेल्या मेसेजमध्ये ट्रोलरने म्हटलं होतं, “सैफ अली खान एक ठग आहे. त्याने पद्मश्री सन्मान विकत घेतला आहे. मुलाचं नाव तैमूर ठेवलं आहे. शिवाय त्याने एका हॉटेलमध्ये मारहाणही केली होती. त्याला अभिनयही येत नाही, तरीही भूमिका कशा मिळतात?”
सैफची प्रतिक्रिया
ट्रोलरच्या या आरोपांनंतर सैफने त्याची प्रतिक्रिया दिली. “मी ठग नाही. पद्मश्री हा पुरस्कार विकत घेतला जाऊ शकतो का? विकत घेणे म्हणजे भारत सरकारला लाच देऊन हा सन्मान मिळवणं इतकी माझी कुवत नाही. तो पुरस्कार खूप मोठा आहे. मला वाटतं मी पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला नको होता. फिल्म इंडस्ट्रीमध्ये माझ्यापेक्षा अनेक ज्येष्ठ अभिनेते आहेत, ज्यांना हा पुरस्कार मिळाला नाही. मात्र माझ्यापेक्षा कमकुवत किंवा पात्र नसलेल्या लोकांनाही हा पुरस्कार मिळाल्यामुळे मला खंतही वाटते”, असं सैफ म्हणाला.
पण आता पद्मश्री पुरस्कार सरकारला परत करण्याची माझी इच्छा आहे, असं सैफने बोलून दाखवलं.
ज्यावेळी मला पद्मश्री दिला जात होता, त्यावेळी माझ्या वडिलांनी म्हटलं होतं की, तू ते स्थान अजून मिळवलं नाहीस जे भारत सरकारने दिलेला सन्मान नाकारु शकेल. त्यामुळे मी तो पुरस्कार आनंदाने स्वीकारला. त्यावेळी मी ठरवलं होतं मी आज ना उद्या असं काम करेन, ज्यामुळे या पुरस्काराचा मान राहील. तेव्हा लोक मला योग्य ठरवतील असंही सैफने सांगितलं.
सैफ अली खानला पद्मश्री
अभिनेता सैफ अली खानला 2010 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते सैफला पद्मश्री प्रदान करण्यात आला होता. त्यावर्षी अभिनेत्री रेखा, बॉक्सर विजेंदर सिंग यांनाही पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. मात्र सैफ अली खानच्या पद्मश्री पुरस्कारावर अनेकांनी आक्षेप घेतला होता.