पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या रविवार २५ ऑगस्ट २०२४ रोजी जळगाव येथे होणाऱ्या “लखपती दिदी” हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हापरिषद शिक्षक, ग्रामसेवक, एस.टी.महामंडळ अशा सरकारी यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर महायुती सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. शासकीय यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या महायुती सरकारचा जाहीर निषेध समाजवादी पार्टीने केला आहे.
उद्या होणाऱ्या ‘लखपती दिदी’ या कार्यक्रमासाठी जळगाव, धुळे, नंदुरबार, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर अशा विविध जिल्ह्यातून सुमारे २१२९ बस जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या प्रत्येक बस मध्ये ४५ महिला घेऊन जाणार आहेत. अशा एकूण ९५८०५ महिला त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व नियोजनासाठी फक्त अमळनेर तालुक्यातून वापरण्यात येणारी यंत्रणा पुढील प्रमाणे आहे. १६४ बस, ३० ग्रामसेवक, १२० शिक्षक, १५० आशा वर्कर, १५० महिला बचत गट समन्वयक, १३ पंचायत समिती कर्मचारी, ३० कंत्राटी कर्मचारी असे एकूण ५०० कर्मचारी या यंत्रणेत असणार आहेत.
या सर्व कार्यक्रमाच्या नियोजनासाठी व्यस्त असणाऱ्या शासकीय यंत्रणेकडून सामान्य जनतेच्या कामांकडे मागील ४ दिवसांपासून दुर्लक्ष करण्यात येत आहे. तसेच शिक्षकांना अडकवून ठेवल्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या कामाला वेळ मिळत नाही, ग्रामीण वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होणार आहे. या सर्व गोष्टींचा कुठेही विचार केला जात नसून जिल्हा परिषद शिक्षकांना शासनाकडून वारंवार अशी शाळाबाह्य कामे लावली जात असल्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ कामापासून दूर ठेवण्यात येत आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागातून घडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर होत असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे नेते प्रताप होगाडे यांनी केला आहे. सामान्य जनतेच्या करातून चालणाऱ्या शासकीय यंत्रणांचा, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना दुय्यम स्थान, अशा प्रकारे वापर होणे हे दुर्दैवी असून लोकांनी सरकारला जाब विचारणे आता गरजेचे असून या सर्व प्रकारांचा समाजवादी पार्टीच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे.