मुंबई : महाराष्ट्राच्या विविध भागात आयोजित केलेले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे 100 वे नाट्य संमेलन अखेर पुढे ढकलण्यात आलं आहे. राज्यात कोरोना व्हायरसचा होणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. (Sangali Natya Sammelan Postponed)
शतक महोत्सवी मराठी नाट्य संमेलनानिमित्त महाराष्ट्रभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची एकमताने निवड झाली आहे. 25 मार्च ते 14 जून या कालावधीत नाट्य जागर मांडण्यात येणार होता. परंतु कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहून नाट्य संमेलन अनियमित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे. पुढील आदेशापर्यंत सर्व तयारी थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाचे कार्यक्रम पुढे ढकलण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला, तरी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून सर्वतोपरी उपाय केले जात आहेत. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, परंतु काळजी घेत गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी नाट्य संमेलनाच्या आयोजकांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये हे संमेलन यशस्वीरित्या करण्याबाबत चर्चा झाली. राजकीय स्तरावर या संमेलनाविषयी उतत्साहाचं वातावरण असलं तरी प्रशासकीय पातळीवर हे संमेलन पुढे ढकलण्याचा पर्याय सुचवण्यात आला होता.
#BREAKING – सांगलीत होणारे नाट्यसंमेलन पुढे ढकललं, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय @JournoKapil pic.twitter.com/sylqeRVN7x
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 13, 2020
25 मार्चला तंजावरमध्ये नाट्य संमेलनाची नांदी होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने 27 मार्चला सांगलीत कार्यक्रम होणार होता. त्यानंतर कोल्हापूर, रायगड, नांदेड, सोलापूर, अहमदनगर, लातूर, कल्याण, नाशिक, बारामती, विदर्भ या ठिकाणी नाट्यजागर केला जाणार आहे. 14 जूनला नाट्य संमेलनाचा समारोप मुंबईत होणार होता. (Sangali Natya Sammelan Postponed)