सांगली | 12 फेब्रुवारी 2024 : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे 12 ते 15 आमदार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणाऱ्या नावांमध्ये काँग्रेसच्या एका युवा आमदाराचं नाव चर्चेत आहे. ज्या युवा आमदाराचं नाव सध्या चर्चेत आहे, त्या आमदाराने एक व्हीडिओ जारी केला आहे. या व्हीडिओतून युवा आमदाराने आपली भूमिका मांडली आहे. काँग्रेसचे युवा नेते, सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांनी राजीनाम्याच्या वृत्तावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी या सगळ्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांच्या राजींनाम्यामुळे माझ्या वेदना झाल्या. माझ्याबाबतही उलटसुलट बातम्या येत आहेत. मात्र मी मात्र कॉंग्रेसमध्येच आहे. मतदारसंघातील जनतेला विश्वासात न घेता कोणताही निर्णय घेणार नाही, असं आमदार विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे. एका व्हीडिओच्या माध्यमातून त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्या आमदारकीच्या राजीनाम्यासंदर्भातील वृत्त गैरसमज पसरवणारे…@INCIndia @INCMaharashtra pic.twitter.com/JYiokt2P7T
— Dr. Vishwajeet Kadam (@vishwajeetkadam) February 12, 2024
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपली पाहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही काही पहिलीच वेळ नाही. इंडिया शायनिंगच्या वेळेस ही मोठ्या संख्येने लोक गेले होते. जे राहिले ते जिद्दीने लढले आणि आमचं त्यावेळेस सरकार आलं. असंच काहीस यावेळेस होईल, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री नितीन राऊत यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. धक्कादायक घडामोडी घडत आहेत. अशोक चव्हाण यांच्यासारखं मोठं व्यक्तिमत्व ज्यांनी मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. त्यांनी पक्ष सोडणं ही आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक बातमी आहे. त्यांनी राजीनामा का दिला त्यामागची करणं माहिती नाही, असं नितीन राऊत म्हणाले.
दिल्लीतून हाय कमांडने काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधला असल्याची माहिती आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी फोनवरुन माहिती घेतली. माणिकराव ठाकरे यांना हायकमांडचा फोन आल्याची माहिती आहे. राज्यात सकाळपासून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. आज किंवा उद्या हाय दिल्लीतून प्रतिनिधी मुंबईत येण्याची शक्यता आहे.