सांगली : सांगलीतील ब्रम्हनाळ (Brahmanal) गावात बचावकार्यादरम्यान बोट उलटून (Boat Overturn) 14 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर ब्रम्हनाळ गावातील नागरिकांचा संताप पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडे मदत मागूनही त्यांनी योजनेअंतर्गत मदत करता येत नसल्याचं कारण पुढे करत बोट नाकारल्याचा आरोप गावकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संदीप राजोबा यांनी केला आहे. गावकऱ्यांचा रुद्रावतार एका व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे.
ब्रम्हनाळ गावात ज्या ठिकाणी बोट बुडाली, त्या घटनास्थळावरुन एका गावकऱ्याने व्हिडिओ केला आहे. ‘कृष्णा-वेण्णा नदीच्या संगमावर आजघडीला 30 फूट पाणी आहे. मात्र प्रशासनाची कुठलीही मदत मिळत नाही. 20 ते 22 जणांना नेणारी बोट उलटल्यामुळे पूरग्रस्त पाण्यात बुडाले. नऊ जणांचे मृतदेह सापडले असून त्यामध्ये एका लहान बाळाचा समावेश आहे. तीन ते चार जण पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचंही सांगण्यात आलं.
‘आमच्या सरपंचांनी प्रशासनाकडे बोटी मागितल्या. मात्र तुमचं गाव पूरस्थिती योजनेत येत नाही, असं सांगत आम्हाला बोटी नाकारल्या. स्थानिकांनी जीव धोक्यात काईलीतून (मोठी कढई) घालून मृतदेह बाहेर काढले. मात्र अजूनही प्रशासनाने आमची दखल घेतली नाही. हा प्रकार असाच सुरु राहिला, तर आम्ही जलसमाधी घेऊ’ असा इशारा गावकऱ्यांनी दिला.
नेमकं काय झालं?
ब्रम्हनाळ (Brahmanal) गावात पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एका बोटीचा वापर करण्यात येत होता. ब्रम्हनाळपासून खटावकडे या पूरग्रस्तांना नेण्यात येतं होतं. बोटीची क्षमता 17 जणांची असताना या बोटीत 30 जण बसले होते. त्यामुळेच सर्व पूरग्रस्तांकडे पुरेसे लाईफजॅकेट्स नसल्याचं म्हटलं जात आहे.
ब्रह्मनाळ आणि वसगडे या गावांचा प्रवास ग्रामपंचायतीच्या नावेने केला जातो. वर्षभर इथली वाहतूक अशाच पद्धतीने होते. पुरामुळे या भागात सध्या वीजेचे खांब, मोठ मोठी झाडं शेंड्यापर्यंत बुडाली आहेत. त्यामुळे नेमकी बोट कुठल्या दिशेने न्यायची हेच लक्षात आलं नसावं. ग्रामपंचायतीच्या बोटीतून नेहमी वाहतूक होत असली तरी पुराच्या पाण्याने मार्ग समजण्यास अडथळा येत होता.
मंदीर, झाड, कठडे पाहून अंदाजाने मार्गक्रमण सुरु होते. त्यावेळी बुडालेल्या झाडाच्या फांदीला बोट लागली आणि ती क्षणात पलटी झाली. कोणाकडेही लाईफ जॅकेट नव्हतं. खासगी बोटीत तशी व्यवस्थाच नव्हती. नियमित सवयीप्रमाणे ही बोट नेली जात होती.
पाण्याची स्थिती इतकी भीषण आहे की बोट पलटी होताच अनेक जण वाहून गेले. मोठी झाडं पाण्यात गेलेत, वीजेचे खांब पाण्यात गेलेत त्यामुळे जायचं कुठं हेच कळत नव्हतं. बुडालेल्या झाडाच्या फांदीने घात केला आणि बोट पलटली.
मृतांमध्ये चार महिला, तीन पुरुष, दोघा लहान मुलांचा समावेश आहे, तर इतरांविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही. इतर बेपत्ता पूरग्रस्तांचा शोध सुरु आहे.
ब्रह्मनाळ बोट दुर्घटनेतील मृतांची नावे
1) कल्पना रवींद्र कारंडे
2) कस्तुरी बाळासो वडेर
3) पप्पू ताई भाऊसो पाटील
4) लक्ष्मी जयपाल वडेर
5) राजमाती जयपाल चौगुले
6) बाबासो अण्णासो पाटील
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत
सांगली बोट दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात जाहीर केली. प्राथमिक स्वरुपात दहा हजांची मदत देण्यात येणार आहे. बोट दुर्घटनेची चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
तहसीलदारांची प्रतिक्रिया
बोटीच्या पंखात कचरा अडकल्यामुळे बोट उलटली, अशी माहिती पलुसचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी दिली आहे. संबंधित बोट ग्रामपंचायतीची असून ती नियमितपणे प्रवासासाठी वापरली जात असल्याचंही पोळ यांनी सांगितलं.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया
लाईफ जॅकेट घातल्याशिवाय कोणालाही बोटीत बसू देता कामा नये : पृथ्वीराज चव्हाण
कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली
कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अजूनही वाढ होत आहे. सांगलीतील आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी 56 फूट 8 इंचावर गेली आहे.
सांगली जिल्ह्यातील 70 हजार नागरिक आणि 21 हजार जनावरं स्थलांतरित करण्यात आली आहेत. 21 हजार 500 हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली आहे. भारतीय सैन्य आणि एनडीआरएफच्या टीमकडून अजूनही बचावकार्य सुरुच आहे.
एनडीआरएफच्या आणखी दोन टीम आणि कोस्टगार्डच्या दोन टीम जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. गरज भासल्यास जिल्ह्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी करण्यात येणार आहे.