सांगली : सांगली येथे पेट्रोलची बाटली टीव्हीवर पडल्याने भीषणा असा स्फोट झाला (Sangli house fire) आहे. हा स्फोट इतका मोठा होता की यामध्ये घराच्या भींती कोसळून पत्रेही उडाले. त्यासोबत किराणा दुकानासह घराला आग लागली. ही घटना आज (22 एप्रिल) पहाटेच्या सुमारास सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे घडली. या आगीत 58 वर्षीय सुरेश धनवडे आणि 52 वर्षीय कांता धनवडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सांगली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार (Sangli house fire) सुरू आहेत.
खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील बाजार चौक परिसरात सुरेश धनवडे यांचे घरगुती किराणा माल आणि स्टेशनरीचे दुकान आहे. सुरेश धनवडे आणि त्यांची पत्नी कांता धनवडे हे नेहमीप्रमाणे झोपले होते. यावेळी पेट्रोलची बाटली टीव्हीवर पडली. बाटलीतील पेट्रोल टीव्हीवर पडल्याने टीव्हीच्या ट्युबने पेट घेतला. त्यामुळे रात्री 11च्या सुमारास अचानक घराला आग लागली. परंतु, मुख्य दरवाज्याजवळ आग लागल्याने हे दोघेही पती-पत्नी घरात अडकून पडले.
यावेळी शेजारील लोकांनी आग दिसताच मागील दरवाजा तोडून जखमी सुरेश आणि कांता धनवडे यांना घरातून बाहेर काढले. त्यांच्यावर सांगलीतील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन विभागाची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. विटा पालिका आणि सोनहीरा कारखान्याच्या अग्निशमन गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले.
विट्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आग नक्की कशामुळे लागली याबाबत पोलिसांचे तर्क सुरू होते. मात्र धनवडे यांनी त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल बाटलीत काढून घरात ठेवले होते. ही बाटली घरातील टिव्ही संचावर ठेवली होती. ती बाटली टीव्हीवर पडून टीव्हीचा स्फोट होऊन आग लागली, असं सुरेश धनवडे यांनी जबाबात म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.