राज्यात नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? याबाबत चर्चा पाहायला मिळत आहे. तसंच जर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिलं गेलं नाही तर शिंदेंना उपमुख्यनमंत्रिपद किंवा केंद्रातील मंत्रिपदाची ऑफर दिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे केंद्रात जाणार का? याबाबतच प्रश्न चिन्ह आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत, असं संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या राजकरणात जाणार नाहीत. शिंदेसाहेबांनी आमचं नेतृत्व करावं दिल्लीत जाऊ नये. महाराष्ट्रातील त्यांचा प्रभाव लोकप्रियत पाहता महाराष्ट्रात राहावं. काय मिळालं असतं काय मिळालं नसतं. हा भूतकाळ आहे, असं संजय शिरसाट म्हणालेत. आज तीन प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दिल्लीतील नेत्यांशी व्हीसीद्वारे संवाद होईल अशी माहिती मिळतेय, असंही शिरसाटांनी सांगितलं आहे.
महायुतीचं सरकार केव्हा स्थापन होणार याचा खुलासा झालेला आहे. लग्नघटिका जवळ आली आहे. काही वराती नाचण्याच्या मूडमध्ये आहेत. काहीजण एकनाथ शिंदे नाराज, अजित दादा पवार नाराज अशी चर्चा करत आहेत. मात्र महायुती मजबूत आहेविरोधीपक्षाच्या नेत्यांनाही शपथविधीचं निमंत्रण दिलं जाईल. त्यांनी यावं आणि या भव्य उत्सवात सहभागी व्हावं. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत शिंदेगटावर वारंवार निशाणा साधताना दिसतात. त्यांच्या या टीकेला शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊतांना दाढीची चांगलीच कल्पना आहे. हेच संजय राऊत राज्यसभेवेळी शिंदेंचे पाय धरत होते. दाढीला हलक्यात घेऊ नका. राज्यसभेवेळी खरतच शिंदेंची ती झालेली चूक आहे. शिंदेंनी दाढीवर हात फिरवला तर महागात पडेल. राज्यसभेवर या संजय राऊतला पाठवायला नको होतं. याने तिथे जाऊन पक्षाचं वाटोळं केलं, अशा शब्दात संजय शिरसांनी टीकास्त्र डागलं आहे.