एक जरी आरोपी सुटला तर त्याचक्षणी…; मनोज जरांगे यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा काय?

| Updated on: Jan 11, 2025 | 4:44 PM

या प्रकरणात मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.या नेत्यांनी टोळ्या पाळल्या. जमीनी हडपल्या, घरं हडपली. यांनी फक्त लोकं मारायचं ठरवलं आहे. यांना जातीचं काही घेणंदेणं नाही. ओबीसी ओबीसी करून तुम्ही किती दिवस लोकांचे मुडदे पाडणार आहे असा सवाल मनोज जरांगे यांनी यावेळी केला.

एक जरी आरोपी सुटला तर त्याचक्षणी...; मनोज जरांगे यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा काय?
Manoj Jarange Patil
Follow us on

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला एक महिना झाला आहे. राज्य सरकारने अखेर या प्रकरणातील आठ आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील अपहरण आणि खुनाच्या आठ आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. बीड- परळीतील दहशत नष्ट होण्यासाठी या प्रकरणात खंडणीतील आरोपींना देखील मोक्का लावण्याची मागणी धाराशीव येथील आक्रोश मोर्चात मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी करीत सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

मनोज जरांगे यांनी मागणी केली आहे की जेवढे आरोपी आहेत त्यांच्यावर मोक्का लावला पाहीजे. खंडणीतील आणि खुनातील आरोपी हे एकच आहेत. ते वेगवेगळे नाहीत. त्या सर्वांना ३०२ मध्ये घ्या. एकही आरोपी सुटता कामा नये. एक जरी आरोपी सुटला तर हे राज्य त्याचक्षणी बंद पाडू. कोणालाही सोडणार नाही असा मोठा इशारा मनोज जरांगे यांनी धाराशीव येथील आक्रोश मोर्चात दिला आहे.  जरांगे म्हणाले की आता तुम्ही नुसतं नख तर लावा. मग कळेल कुत्र्यासारखे सालटे निघतील. आता एवढं सोपं नाही. मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे, तुमच्यावर विश्वास ठेवला. एकही आरोपी सुटणार नाही हा शब्द तुम्ही दिला. सर्वांना ३०२ लागेल. मोक्का लागेल. म्हणून मराठे शांत आहेत. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यालाही न्याय मिळाला पाहिजे. नाही मिळाला तर आम्ही खांद्याला खांदा लावून लढू, या कुटुंबांशी दगाफटका केला तर तुमचा कार्यक्रम संपलाच म्हणून समजा असाही इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

मी अजून धमकी दिली नाही…

या धाराशीव नगरीत पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला होता. मुख्यमंत्री साहेब तुम्ही जागे आहात का? एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार होत असेल तर तुमच्यावर आणि तुमच्या गृहखात्यावर थू करतो आम्ही. या लेकराने कसं सहन केलं असेल. बलात्कार करणाऱ्याच्या पोराला आणि आईला अटक का नाही केलं मग?. मी या मॅटरमध्ये हात घातला नाही. मी धाराशीवमध्ये घुसलो तर बलात्कार करणाऱ्यांना सोडणार नाही. बलात्कार करणाऱ्यांना अटक करा. फास्ट ट्रॅकवर प्रकरण टाका आणि त्या कुटुंबाला संरक्षण द्या. जन्मठेप होईपर्यंत आरोपी सुटता कामा नये. मी अजून धमकी दिली नाही. जेव्हा देतो तेव्हा मागे हटत नाही. या तीन वर्षाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. मला माझ्या तीन वर्षाच्या लेकीला न्याय पाहिजे. तुम्हाला दुसरं काही मागत नाही. जो माणूस समाजाची बाजू घेईल. त्यांच्यामागे खंबीर उभे राहा असेही जरांगे यांनी यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

२५ तारखेनंतर यांचा कार्यक्रमच लावतो

तुमच्या मंत्रिमंडळातील नेत्याने पैदास केलेल्या गुंडांनी हे सर्व केलं. या गुंडांनी खून केला आणि आरोपी अटकेत नाहीत. गृहमंत्री आहेत की झोपले ? कृष्णा कोरे या व्यक्तीचा मृत्यू झाला. राज्यातलं जे काही असेल ते मला सांगत राहा. मी आहे यांच्या मुंडक्यावर पाय द्यायला. तुम्ही अंतरवलीत सर्व आणून द्या. २५ तारखेनंतर यांचा कार्यक्रमच लावतो असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. केजमध्येही अशीच एक मुलगी मारून टाकली. हे आरोपी फरार आहेत. बाहेर दारू पितात.ही सुद्धा त्या धन्या मुंड्यांनी पाळलेली पैदासच. या राज्यातील लोकांनी आता जागं होणं गरजेचं आहे. मी कुणाला काही बोललो नाही. या धन्या मुंड्याचं नाव घेतलं नाही. जो खूनं करायचं सांगतो, अशा लोकांच्या आम्ही नाव घेत नाही. पण धनंजय देशमुख यांना पोलीस स्टेशनमधून आल्यावर धमकी देण्यात आली. तेव्हापासून नाव घेऊन मागे लागलो आहे. मी मागे लागलो तर मग पाणीच पाजतो. मी २५ तारखेपर्यंत मी काही बोलणार नाही. कारण २५ तारखेपासून आमरण उपोषण. एकदा उपोषण झालं आणि आरक्षण मिळालं की याचं परळीपासून मुंबईपर्यंतचं सर्वच काढतो. मग हा कुठून कसा सुटतो ते मी पाहणार आहे. कारण मी त्याला सांगितलं माझ्या नादाला लागू नको. आता लागला असेही जरांगे म्हणाले.