सातारा : सध्याच्या कोरोना विषाणूच्या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आला. यानंतर देशभरात लाखो मजूर अडकून पडले. घरापासून दूर अडकून पडलेल्या या मजुरांचे एकीकडे उदरनिर्वाहाचे हाल होते, तर दुसरीकडे घराची ओढ होती. अशाच काही अडकून पडलेल्या परप्रांतिय मजुरांना त्यांच्या गावाकडे पोहवण्यासाठी महाराष्ट्राच्या लालपरीने थेट पश्चिम बंगालला धाव घेतली (Satara ST Drivers travel West Bengal for migrant labour). 44 मजुरांना घेऊन धावलेल्या या बसने केवळ 5 दिवसात तब्बल 4 हजार 600 किलोमीटरचा पल्ला गाठत पश्चिम बंगाल गाठलं. हे खडतर काम होण्यामागे सातारा डेपोचे 4 चालक-वाहक यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
पोलीस, डॉक्टर, नर्स यासारख्या अनेक प्रकारच्या सेवा देणाऱ्या वर्गाचा ठिकठिकाणी सत्कार होतो आहे. याच प्रकारचे अतुलनीय काम करणाऱ्या या सातारा जिल्ह्यातील या 4 वाहकांचा देखील सत्कार करण्यात आला आहे. हे अतिशय खडतर काम पूर्ण केल्याने सातारा डेपोतील अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांचा गौरव केला आहे. त्यांनी परप्रांतीय मजुरांना सुमारे 4600 किलोमीटर प्रवास करुन केवळ 5 दिवसातच त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडले. यासाठी त्यांना येताना चक्रीवादळाच्या धोक्याचाही सामना करावा लागला.
केंद्राचा परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने स्वीकारला. महाराष्ट्रातही विविध राज्यांतून आलेल्यांना सोडण्याचं नियोजन झालं. एसटी आणि रेल्वे या दोन्हीतून जागा मिळेल तसे परप्रांतिय मायभूमीत परतण्यासाठी धडपडत होते. परप्रांतीय मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी महाराष्ट्राची ‘लालपरी’ही सज्ज झाली. सातारा जिल्ह्यातून 44 जणांना पश्चिम बंगालमध्ये असलेल्या नुधिया या जिल्ह्यात सोडण्यासाठी सातारा एसटी विभागाने तयारी केली. मात्र यासाठी सुयोग्य, तार्किक कौशल्य असणाऱ्या संयमी वाहनचालकांची गरज होती. सातारा आगारचे अधिकारी संजय भोसले, रेश्मा गाडेकर यांनी 2 गाड्या पाठवण्याचे ठरवले. त्यासाठी विनाअपघात सेवा केलेले अनुभवी चालक निवडले गेले. त्यापैकी सातारा येथून जाणाऱ्यांमध्ये एमएच 13 ईओ 8471 या गाडीसाठी सुरेश जगताप आणि खटाव तालुक्यातील नवखे वाहनचालक संतोष निंबाळकर यांची निवड केली. तर महाबळेश्वर येथून जाणाऱ्या एमएच 14 बीटी 6299 या गाडीसाठी आतिश वाघमारे आणि लक्ष्मण खुडे यांची निवड करण्यात आली.
खरंतर या चालकांच्या घरच्यांना त्यांची काळजी वाटू लागली. मात्र कुटुंबाचा विरोध पत्करुन ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदाला जागत या अवलिया कर्तव्यनिष्ठ चालकांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. कामगारांना निर्धारित वेळेत पोहोचवून सुखरुप परतण्याची मोहीम या चार वाहकांनी हाती घेतली. एक एसटी बस महाबळेश्वर येथून तर दुसरी एसटी बस सातारा शहरातील राजवाडा बसस्थानकातून या परप्रांतीय मजुरांना घेऊन रवाना झाली. या प्रवासात त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. यात महत्वाचे आव्हान म्हणजे राज्याबाहेर प्रवास करताना रस्ते योग्य आहेत की नाही याची खातरजमा करुनच पुढे जावे लागले. रोजचा 900 किलोमीटरचा प्रवास सुरु होता. 863 लीटर डिझेल या संपूर्ण प्रवासाकरिता लागले. त्यासाठी 44,000 रुपये खर्च झाले.
संपूर्ण रस्त्यावर कुठेही खाण्यापिण्याची सोयही नव्हती. मात्र, राज्याच्या सीमेवर या एसटी बसेस थांबून तिथेच थोड्या वेळात खाणंपिणं आटोपून पुढचा प्रवास सुरु ठेवावा लागत होता. हा अथक प्रवास योग्य दिशेने होण्यासाठी त्यांनी नकाशाचा आधार घेतला. निवडलेला मार्ग योग्य आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी ठिकठिकाणी मार्ग विचारत जावे लागले. सोबत असणाऱ्या परप्रांतीय मजुरांना देखील हा मार्ग अपरिचित होता. कारण याअगोदर त्यांनी रेल्वेने प्रवास केलेला होता. राज्याबाहेर फलकांची भाषाही बदललेली होती. कोलकात्यात रात्रीच्या वेळी त्यांना योग्य मार्ग न सापडल्याने तब्बल दीड तास मार्ग शोधावा लागला. अशा एक ना अनेक समस्यांना तोंड देत साताऱ्यातून हैदराबाद, विजयवाड, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कोलकाता ते नुधिया असा 4 हजार 600 किलोमीटरचा प्रवास करत हे चालक केवळ 5 दिवसांत पश्चिम बंगालला पोहचले.
खरंतर त्यांना या प्रवसाकरिता 7 दिवसांचा कालावधी दिला होता. मात्र, आपल्या कर्तव्यात कोणतीही कसून न करणाऱ्या या वाहन चालकांनी केवळ 5 दिवसात ही कामगिरी पूर्ण केली. इथे पोहचल्यावर परप्रांतीय मजुरांनी या चालकांचे पुन्हा पुन्हा आभार मानले. ते त्यांना जणू त्यांना देवदूतच समजत होते. त्यांनी या चालकांना ‘साहब दो दिन तो रुको, हमे आपकी सेवा का मौका तो दो’ असं म्हणत आग्रह केला. पाहुणचार घेऊन मगच परतीचा प्रवासाला जावे अशी वारंवार विनंती केली. मात्र दुसरीकडे वादळाचा धोका समोर येऊन ठेपला होता. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर त्या राज्याबाहेर पडायचे होते.
पश्चिम बंगालच्या सीमेवरील नुधिया येथे कामगारांना सोडून परतत असतानाच अन्फाम वादळ उत्तर भारतात धडकले. अन्फाम वादळाचा जोर वेगानं वाढत असतानाच त्यांनी कोलकाता सोडलं. कोलकाता सोडून 60 किलोमीटरचं अंतर पार करेपर्यंत अन्फामच्या वादळाने कोलकात्याचा बराचसा भाग पाण्याखाली गेला. यातून कशीबशी वाट काढत या महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेस साताऱ्याकडे निघाल्या होत्या. ओरिसा राज्यातील खडकपूर येथे ‘एनडीआरएफ’- राष्ट्रीय आपत्ती कृती दलाच्या जवानांनी त्यांची सुरक्षित ठिकाणी राहण्याची सोय केली. त्या रात्री काही काळ विश्रांती घेऊन ते पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला लागले. इकडे त्यांच्या कुटुंबियांचा संपर्कही 1 ते 2 होत नव्हता. उपलब्ध असणाऱ्या नेटवर्कमध्ये आणि शिल्लक बॅटरीमध्ये ते आपल्या डेपो अधिकाऱ्यांना माहिती कळवत होते. अखेर साताऱ्यात पोहचल्यावर या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. मात्र हे चालक इथेच कामगिरी करुन थांबले नाहीत, तर ते परतून आल्यावर पुन्हा पुढच्या मोहिमेवर रवानाही झाले.
हेही वाचा :
पुण्यात आठवडाभरात 5700 प्रवासी परतले, बिहारमधून दररोज जवळपास 400 लोक पुण्यात
त्र्यंबकेश्वरमध्ये कंत्राटी कामगारांचं स्वत:ला कमरेपर्यंत गाडून घेत आंदोलन
Satara ST Drivers travel West Bengal for migrant labour