पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. बोधचिन्हातून शनिवारवाडा हटवण्याची मागणी सत्यशोधक ओबीसी फेडरेशनसह अनेक संघटनांनी केली आहे. त्याचबरोबर या संघटनांनी विद्यापीठाच्या पर्यायी लोगोचं अनावरण केलं आहे. या लोगोत पिंपळाचं पान, फुले पगडी, भिडे वाडा, सावित्रीबाईंची प्रतिमा, पुस्तक आणि ज्ञानज्योतीचा समावेश केला आहे. विद्यापीठाच्या बोधचिन्हात शनिवारवाड्याऐवजी या लोगोचा समावेश करण्याची मागणी संघटनांनी केली आहे.
शनिवारवाड्याचा आणि शिक्षणाचा, विद्येचा काहीच संबंध नाही. पेशवाई शनिवारवाड्याच्या रंगीत महालातून मनुस्मृतीनुसार कारभार करत असल्याचा आक्षेप आहे. त्याचबरोबर शनिवारवाड्याच्या ऐय्याशीच्या कौर्याच्या आणि कपटकारस्थानासाठी प्रसिद्ध असल्याचा या संघटनांचा आरोप आहे. जोपर्यंत विद्यापीठाच्या बोधचिन्हातून शनिवारवाडा हटवला जात नाही, तोपर्यंत लोकशाही लढा देण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
शनिवारवाडा हटवण्याची मागणी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सत्यशोधक ओबीसी फेडरेशनने याबाबतची मागणी केली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हाच्या कमळातील शनिवारवाड्याचं चित्र हटवा, त्याजागी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा लावा, अशी मागणी करण्यात आली. सत्यशोधक ओबीसे समाजाचे राज्य संघटक सचिन माळी यांनी ही मागणी केली.
तीन वर्षापूर्वी पुणे विद्यापीठाचं नामांतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं करण्यात आलं. या विद्यापीठाची स्थापना 1948 मध्ये झाली. त्यानंतर 1950 मध्ये या विद्यापीठाचं बोधचिन्ह तयार करण्यात आलं, त्यावेळी बोधचिन्हात शनिवारवाड्याची प्रतिमा होती. तीन वर्षांपूर्वी नाव बदललं मात्र आता बोधचिन्हातही बदल करा, अशी मागणी ओबीसी फेडरेशनने केली आहे.
विद्यापीठात पगडीवरुन गोंधळ
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात पुणेरी पगडी विरुद्ध फुले पगडी असा वाद रंगला. ‘पुणेरी पगडी’ घातल्यामुळे विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात गोंधळ घातला. पुणेरी पगडी की फुले पगडी यावरुन हा वाद होता. विद्यार्थ्यांनी पुणेरी पगडीला विरोध करत महात्मा फुले पगडीचा आग्रह धरला. मात्र मान्यवरांचं पुणेरी पगडीने स्वागत केल्याने विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केला.
संबंधित बातम्या
‘सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या बोधचिन्हातून शनिवारवाडा काढा’