मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काल (14 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकाडऊनचा (Lockdown rules india) कालवाधी वाढवत 3 मे पर्यंत केला. त्यानंतर आज (15 एप्रिल) केंद्रीय गृह मंत्रालयातून लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात कोणाला सूट मिळणार, काय नियम असणार याबाबत मार्गदर्शन करणारी नियमावली केंद्राने जारी केली (Lockdown rules india) आहे.
या नियमावलीमध्ये अत्यावश्यक सेवा सोडल्या तर इतर सर्व सेवा बंद राहणार आहेत. 3 मे पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा, रेल्वे सेवा, मेट्रो, बससेवा त्यासोबत शाळा कॉलेजही बंद असणार आहेत.
विशेष म्हणजे केंद्राच्या नव्या नियमावलीमध्ये शेतकऱ्यांना सूट देण्यात आली आहे. शेती संबंधित काम लॉकडाऊन दरम्यान सुरु राहतील. तसेच या दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असंही या नियमावलीत म्हटलं आहे.
लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात काय सुरु राहणार ?
लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवा, शेती संबंधित कामं, आरोग्य सेवा, मेडिकल, रुग्णालय, नर्सिंग होम, दवाखाने, पॅथलॅब आणि औषधाशी संबंधित सर्व कामं सुरु राहतील. त्यासोबत बँका आणि एटीएमही सुरु राहणार आहेत.
लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात काय बंद राहणार ?
आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक, ट्रेन, मेट्रोसेवा, बससेवा, सर्व शैक्षणिक संस्था, औद्योगिक आणि कमर्शिअल कामे, हॉटेल, टॅक्सी, ऑटोरिक्षा, सायकल रिक्षा, चित्रपट गृह, शॉपिंग, कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वीमिंग पूल, बार, कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, सर्व धार्मिक कार्यक्रम बंद राहणार आहेत.
विशेष म्हणजे कोरोनाच्या हॉटस्पॉट भागांमध्ये कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही. या भागातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी आहे. त्यासोबत सर्व जीवनावश्यक वस्तू या घरपोच देण्यात येणार आहेत. या विभागात अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांनाच जाण्यायेण्याची मुभा मिळणार आहे.
दरम्यान, देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत देशात 9756 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 377 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 1305 जण कोरोनामुक्त झाले आहेत.