बुलढाणा : मैत्रिणीच्या भावाने बदनामीची धमकी दिल्याने एका विद्यार्थींनीने विहीरीत उडी मारत आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना सिंदखेडराजा येथे घडली असून चार शिक्षक आणि चार विद्यार्थ्यांसह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहा गवई असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून नेहाच्या वडिलांनी शाळेविरुद्ध तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
नेहासह अन्य मैत्रिणी ह्या मित्रांसह 17 डिसेंबर रोजी शाळा सोडून अन्य ठिकाणी फिरत असल्याचे नेहाच्या मैत्रिणीच्या भावाने पाहिले तेव्हा त्याने या सर्वांना तुमची नावं घरी आणि शाळेत शिक्षकांना सांगतो आणि तुमची बदनामी करतो म्हणून अशी धमकी दिली. त्यामुळे त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या झालेल्या घटनेवर मृत नेहाच्या वडिलांनी शाळेवर आरोप लावलाय की, नेहासह तिच्या मैत्रिणी ह्या शाळेतून बाहेर गेल्याच कशा? तर विद्यार्थी शाळेत गेल्यावर संपूर्ण जबाबदरी ही शाळेतील शिक्षकांची आहे, त्यामुळे त्यांनीच त्यांच्या मुलीला मारले आहे. यासंदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकला विचारणा केली असता, त्यांनी मात्र हा आरोप खोडून लावत फिरायला गेलेली मृतक विद्यार्थिनी आणि तिचे मित्र, मैत्रिणी हे घटनेच्या दिवशी शाळेत आलेच नाही त्यामुळे या घटनेशी त्यांचा संबंध नाही असे सांगितले. मात्र मृतक विद्यार्थिनीच्या शिक्षकांनी हजेरी पटावर खोडतोड केली असल्याचे स्पष्ट दिसले.
एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल
नेहमीप्रमाणे १७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता त्यांनी नेहाला शाळेत सोडले होते. त्यानंतर ते सावंगी भगत येथे असलेल्या शेतात गेले. दरम्यान, दुपारी अचानक 3 वाजता शाळेतील शिक्षक कामे यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की तुमची मुलगी नेहा आणि तिच्या दोन मैत्रिणी, दोन मित्रांसह हे सर्वजण शेंदुर्जन येथे चित्रकला परीक्षेचा निकाल आणायला गेले असल्याची माहिती त्यांना मिळाली. तर थोड्यावेळात पुन्हा त्यांचाच फोन आला की, हे सर्वजण हिवरा आश्रमला दिसलेय तेव्हा नेहाचे वडील हे त्यांना शोधण्यासाठी हिवरा आश्रम, शेंदुर्जन येथे शोध घेण्यासाठी गेले, मात्र तिथे कोणी दिसले नाही म्हणून परत शाळेत आले. शाळेत जाऊन मुख्याध्यापकांची भेट घेऊन हे सर्व कुठे गेले? अशी विचारणा केली, तेंव्हा त्यांनी ते कुठे गेले? हे आम्हाला माहीत नसल्याचे सांगितले. याशिवाय उडवाउडवीची उतर दिल्याचा आरोप केला. त्यानंतर आपली मुलगी नेहा हिचा शेंदुर्जन येथे विहिरीत मृत्यू झाल्याचे कामे सर यांनीच फोनद्वारे त्यांना सांगितले.
या घटनेत विद्यार्थिनीच्या मृत्यूस कारणीभूत असलेले 4 विद्यार्थी, शिक्षक अनिकेत मांटे, मुख्याध्यापक संतोष दसरे, वर्गशिक्षक ठाकूर, शिक्षक कामे आणि गाडी चालक अशा नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.