आतापर्यंत एक लाख २५ हजार गुंतवणूकदारांना सुमारे १००० कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या टोरेस या पाँझी स्कॅम्सची हाताळणी युक्रेन येथील लोक करीत असल्याचे उघडकीस आले होते. आता या घोटाळ्यातील सर्व सर्व्हर यंत्रणा देखील परदेशातून हाताळली जात असल्याचे या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने म्हटले आहे. टोरेस ज्वेलर्स घोटाळ्याचे सर्व सूत्रधार परदेशातून सोशल मीडिया खाती, सीसीटीव्ही सर्व्हर हाताळत आहेत असे आर्थिक गुन्हे शाखेने ( EOW ) म्हटले आहे.
ही कंपनी आपल्या ग्राहकांना अजूनही आपण तुमची सगळी देणी देणार असल्याचा दावार इन्स्टाग्राम अकाऊंटवरून करीत आहे. लवकरच कंपनी गुंतवणूकदारांना पैसे परत करेल असे आश्वासन कंपनीचे संचालक परदेशातून देत आहेत. या प्रकरणात त्यामुळे परदेशातील सूत्रधारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न आर्थिक गुन्हे शाखेला करावा लागणार आहे. प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या नावाने ही कंपनी स्थापण झाली होती. त्यानंतर त्यांनी दादर, कांदिवली आणि इतर परिसरात पॉश दुकाने उघडून त्याद्वारे टोरेस ब्रँडच्या ज्वेलरीची विक्री केली. त्यानंतर यातील खडे, रत्न आणि ज्वेलरीवर गुंतवणूकीची आमीष दाखवून हजारो कोटींची कोटींची फसवणूक केल्याचा आरोप या कंपनीवर आहे. हे खडे आणि रत्ने खोटी असल्याचे उघड झाले आहे.
टोरेस ज्वेलर्स घोटाळ्यात मुद्दामहून तपासात विलंब करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यासाठी परदेशातून त्यांची सोशल मीडिया खाती हाताळली जात आहेत असे आर्थिक गुन्हे शाखेने म्हटले आहे. सोशल मीडियावर ही कंपनी लवकरच त्यांच्या गुंतवणूकदारांना पैसे परत करेल असा दावा करीत आहे. टोरेस त्यांच्या कर्मचाऱ्यांचे फोटो, व्हिडिओ आणि सीसीटीव्ही व्हिडिओ पोस्ट करीत आहे. या प्रकरणात येथील स्थानिक आरोपीच जबाबदार असून कंपनी जबाबदार नाही असा दावा कंपनी तिच्या वेबसाईटवर देखील केला आहे. सीईओ मोहम्मद तौसिफ रियाझ उर्फ जॉन कार्टर, संचालक सुरेश सुर्वे आणि अकाऊंटंट हेड अभिषेक गुप्ता हेच फसवणूकीसाठी जबाबदार आहेत असे कंपनीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंट आणि वेबसाईटवर पोस्ट केले आहे.
टोरेस कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रियाझ आणि गुप्ता यांचे फोटो देखील पोस्ट केले असून त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्याला 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या तिन्ही जणांनी स्वत:ला या प्रकरणाचे व्हिसलब्लोअर म्हणवून घेतले आहे. संचालक सुरेश सुर्वेला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली होती, तर रियाझ वॉण्टेड आहे आणि अभिषेक गुप्ता यांनी स्वेच्छेने पोलिसांकडे जाऊन मदतीचा हात पुढे केला आहे.
टोरेस घोटाळ्यानंतर आत्ता अर्थिक गुन्हे शाखेचे गुप्तवार्ता (इंटेलिजन्स) युनिट पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कंपन्यांना सुरु होण्यापूर्वीच त्यांना छडा लावून त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होणार आहे. या युनिटवर सेटलमेंटचे आरोप झाल्यानंतर चार वर्षापासून हे युनिट बंद करण्यात आल होते. टोरेससारख्या आर्थिक फसवणूक करणाऱ्या पाँझी स्कीम्सवर नजर ठेवण्याची आणि ते रोखण्याची जबाबदारी या युनिटवर होती. युनिटमधील काही अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर हे महत्त्वाचं युनिट बंद केले होते. आर्थिक गुन्हे शाखेचे हे पथक मोठ्या बँका तसेच वित्तीय संस्थांची व्हीजिलन्स युनिट फ्रॉड अँड रिकव्हरी इंटेलिजन्स युनिट यांच्या अधिकाऱ्यांसह हे युनिट काम करत असते.
टोरेस ज्वेलरी कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणूकीच्या फसवणूक प्रकरणातील आरोपींचा श्रीलंकेत देखील आपली कार्यालये सुरू करण्याचा विचार होता. श्रीलंका हे त्यांचे पुढील लक्ष्य होते, असे पोलिसांना तपासादरम्यान समजले आहे. टॉरेस ज्वेलरी चालवणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करणाऱ्या दोन परदेशी नागरिकांसह तीन आरोपींना 7 जानेवारी रोजी अटक करण्यात आली असून ते सध्या पोलिस कोठडीत आहेत.दोन वाँटेड आरोपी – कंपनीचे सीईओ तौसिफ रियाझ उर्फ जॉन कार्टर (33)( भारतीय नागरिक) आणि युक्रेनियन नागरिक असलेल्या ओलेना स्टोयन (33) यांनी तेथे कार्यालय सुरू करण्याच्या उद्देशाने श्रीलंकेला भेट दिली होती अशी माहिती उघड झाली आहे.
टोरेस घोटाळा प्रकरणातील पोलिसांनी अटक केलेल्या लक्ष्मी यादव यांच्या याचिकेवर ठाणे सत्रन्यायालयात आज सुनावणी होणार आहे.दुपारी ही सुनावणी होणार आहे.लक्ष्मी यादव हिने 30 डिसेंबर रोजी ठाणे पोलीस आयुक्तालय आणि मुंबई पोलीस आयुक्तालय यांना मेल करून या सर्व घोटाळ्याची माहिती दिल्याचं दावा केला आहे. तर रश्मी गुप्ता यांच्या नावाने मुंबईतील 4 टोरेस दुकानाचे एग्रीमेंट झाल्याची माहिती उघड झाली आहे.