नवी दिल्ली: भारतातील लिंग गुणोत्तराचं प्रमाण आश्चर्यकारक घसरल्याने चिंता वाढली आहे. नागरी नोंदणी प्रणाली अंतर्गत 2007 ते 2016 या कालावधीतील स्त्री-पुरुष जन्मदराची आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. दक्षिणेकडील राज्यात स्त्रियांचं प्रमाण तसं समाधानकारक होतं, मात्र ते सुद्धा घसरल्याने भारताच्या चिंतेत भर पडली आहे. हरियाणा आणि पंजाब यासारख्या राज्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचं प्रमाण अत्यंत कमी होतं. तर केरळमध्ये हे प्रमाण जास्त होतं. पण आता केरळमध्येही महिलांची संख्या घटली आहे.
आंध्र प्रदेश आणि राजस्थानमधील स्त्री-पुरुष जन्मदराची आकडेवारी अत्यंत भीषण आहे. 2016 मधील आकडेवारीनुसार या दोन राज्यांमध्ये हजार पुरुषांमागे केवळ 806 स्त्रिया आहेत. म्हणजेच स्त्रियांची संख्या जवळपास 200 ने कमी आहे.
तामिळनाडूत 2007 मध्ये प्रति हजार पुरुषांमागे 935 स्त्रिया असं गुणोत्तर होतं, मात्र 2016 मध्ये ही आकडेवारी 840 पर्यंत घसरली आहे.
तर कर्नाटकात हेच गुणोत्तर हजार पुरुषामागे 896, तेलंगणात 2013 मधील आकडेवारी 954 इतकी होती, तेलंगणा स्वतंत्र राज्य स्थापित झाल्यानंतर तोच आकडा 881 पर्यंत घसरला.
ज्या दक्षिणेकडील राज्यांनी स्त्री-पुरुषांचं प्रमाण काहीसं स्थिर ठेवलं होतं, तिथेही आता स्त्रीयांचं प्रमाण घसरल्याने ही चिंतेची बाब आहे.
घसरतं लिंग गुणोत्तर प्रमाण (पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या)
राज्य 2007 2016
आंध्र प्रदेश 974 806
कर्नाटक 1004 896
तामिळनाडू 935 840
ओदिशा 919 858
उत्तराखंड 869 825
तामिळनाडूच्या जन्मदरात प्रचंड उलथापालथ पाहायला मिळाली. 2006 मध्ये इथे प्रति हजार पुरुषांमागे 939 स्त्रिया होत्या. हा आकडा 2015 मध्ये तब्बल 818 पर्यंत घसरल्या, तर 2016 मध्ये त्यामध्ये थोडीशी सुधारणा होत 840 पर्यंत पोहोचला.
महाराष्ट्रात सुधारणा
दरम्यान, दक्षिणेकडील राज्यांमध्ये स्त्रियांचं प्रमाण घटत असताना, इकडे महाराष्ट्र, दिल्ली आणि आश्चर्यकारकरित्या हरियाणामध्ये मुलींचं प्रमाण काहीस वाढलं आहे.
2007 ते 2016 या काळात लिंगगुणोत्तराचं प्रमाण अत्यंत व्यस्त असणाऱ्या पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. दिल्ली आणि आसामने तर मोठी उडी घेतली असं म्हणायला हरकत नाही. कारण या राज्यांनी स्त्री जन्मदरात 848 वरुन 902 आणि 834 वरुन 888 अशी मजल मारली.
पण पश्चिम बंगाल, ओदिशा, जम्मू काश्मीर आणि गोवा या राज्यांमध्ये हे प्रमाण प्रचंड घसरलं आहे. बिहारमध्ये स्त्री जन्मदर 924 वरुन 837 वर, तर उत्तर प्रदेशात 930 वरुन 885 वर घसरला.
एकंदरीत या आकडेवारीवर नजर टाकली असता, भविष्यातील चिंता वाढणारी आहे. कारण हजार पुरुषांमागे 200 स्त्रियांचं प्रमाण कमी असेल, तर 20 वर्षांनी असंच चित्र राहिल्यास, ही तफावत आणखी वाढत जाईल.