2022 बंड करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. परंतू आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 132 जागा निवडून आल्या. त्यामुळे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. त्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते, सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाष्य केलं आहे. भाजपच्या आमदारांच्या रेट्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. परंतू एकनाथ शिंदे हे आता कोणत्या खुर्चीवर आहेत याला इतिहासात महत्त्व राहिलेलं नाही. जनतेच्या मनावर राज्य करणारे ते लोकनेते आहेत, असं शहाजीबापू म्हणालेत.
बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यानंतर मतमोजणी दिवशी विरोधक देश सोडून पळून जातील, असं संजय राऊत आज सकाळी बोलताना म्हणाले. त्यावर शहाजीबापूंनी प्रतिक्रिया दिली आहे. बॅलन्स पेपरवर घ्या. ईव्हीएम मशीनवर निवडणुका घ्या. अजून कुठलेही संशोधन करा. परंतु संजय राऊत तुमचं काल घर भुई सपाट झालेला आहे. त्यातील पत्र विटा काही चांगले असतील तर गोळा करा आणि तुमचं झोपडं बांधा. या संजय राऊतांनी शिवसेनेचे तुकडे करून टाकले. आता उरली सुरली ठाकरेंच्या शिवसेनेचे वाटोळं केल्याशिवाय तो काय आता गप्प बसत नाही, असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पाच खासदार अजित पवार यांनी फोडून आणल्यावरच केंद्रात त्यांना मंत्रिपद मिळणार. अशी ऑफर भाजपने अजितदादांना दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यावर शहाजीबापू पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हा संध्याकाळी वेगवेगळी दिवा स्वप्न पाहणारा माणूस आहे. जे स्वप्न संध्याकाळी पाहतो ते सकाळी टीव्ही समोर सांगण्याची सवय आहे. अजितदादांना अशी भाजपने कोणतीही अट घातलेली नाही, हे मी खात्रीने सांगतो, असं पाटलांनी म्हटलं आहे.
विधानसभेला झालेल्या दारुण पराभवामुळे विरोधकांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल झालं आहे. घराबाहेर पडून राजकारणात पुन्हा कसे यायचे यासाठी हा शोधलेला मार्ग म्हणजे ईव्हीएमवरती आक्षेप असल्याचा आरोप शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. तर पक्ष वाढीसाठी एकनाथ शिंदे साहेब पक्ष पातळीवर किंवा शासकीय पातळीवर मला मोठी जबाबदारी देतील. ते काम मी चांगल्या पद्धतीने पार पाडेल आणि दिलेल्या संधीचं सोनं करेल, असंही त्यांनी म्हटलंय.