मुंबई : मराठी मालिकांमध्ये सगळ्या ब्राह्मण अभिनेत्रीच का? असा प्रश्न विचारुन राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाके याने खळबळ उडवून दिली आहे. मात्र मराठी मालिकांमध्ये ब्राह्मणेतर अभिनेत्रीही तितक्याच हिरीरीने सहभागी होत असल्याचं सांगत मराठी मनोरंजन विश्वातून सुजयच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. (Sujay Dahake on Brahmin Marathi TV Actresses)
‘तुझ्यात जीव रंगला’मधील पाठकबाई साकारणारी अक्षया देवधर, ‘माझ्या नवऱ्याची बायको’तील अभिनेत्री अनिता दाते, सायली संजीव, ऋता दुर्गुळे असे दाखले देत सुजय डहाकेने मराठी मालिका विश्वातील ‘जातवास्तव’ अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. व्हाईट कॉलर क्लास इतरांना कंट्रोल करत आहे, असा आरोपही सुजयने यावेळी केला. एका मराठी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सुजयने आपलं मत व्यक्त केलं.
’23 व्या वर्षी मला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्याचा इतरांना राग आहे. महाराष्ट्रात वर्षाला पाचशे एकांकिका होतात. त्यातून सातारा-सांगली किंवा कुठल्याही ग्रामीण भागातील एकही मुलगी मिळत नाही का?’ असा सवाल सुजयने विचारला. ‘एका मालिकेत (रंग माझा वेगळा) गोऱ्या अभिनेत्रीला काळी केली, काळ्या रंगाची अभिनेत्री मिळाली नाही का?’ असा जळजळीत प्रश्नही सुजयने विचारला.
महाराष्ट्रीय व्यक्ती सर्वात जास्त वर्णभेदी असतात. कारण वधू वरं संशोधनावेळी ते गोरी मुलगी पाहिजे, गव्हाळ रंग पाहिजे अशा अपेक्षा लिहितात’ असंही सुजय म्हणाला. सुजय डहाकेने दिग्दर्शित केलेल्या ‘शाळा’ या पहिल्याच सिनेमाला चांगलं यश मिळालं होतं. त्यानंतर फुंतरु, आजोबा यासारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. लवकरच त्याचा ‘केसरी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सुजयच्या वक्तव्याचा मराठी मालिकाविश्वातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. ‘अगंबाई सासूबाई’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने फेसबुक पोस्टवरुन सुजयला टोला हाणला आहे. ‘मी ब्राह्मण नाही, सीकेपी आहे. माझ्याकडे काम आहे. याला टॅलेंट म्हणूया का?’ असा तिरका सवाल तिने विचारला आहे. (Sujay Dahake on Brahmin Marathi TV Actresses )
खरं तर, सध्याच्या टीव्ही मालिकांमध्ये ब्राह्मणेतर समाजातील अभिनेत्रीही तितक्याच प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत.
मालिका – ब्राह्मणेतर अभिनेत्री
राजा राणीची गं जोडी – शिवानी सोनार
बाळूमामाच्या नावानं चांगभलं – कोमल मोरे
स्वामिनी – सृष्टी पगारे
मिसेस मुख्यमंत्री – अमृता घोंगडे
स्वराज्यरक्षक संभाजी – प्राजक्ता गायकवाड
विठू माऊली – एकता लब्धे
प्रेमाचा गेम सेम टू सेम – सायली जाधव
वैजु नं 1 – सोनाली पाटील
आतापर्यंत मालिकांमधील अभिनेत्री
तू अशी जवळी रहा – तितिक्षा तावडे
आम्ही दोघी– खुशबू तावडे
मानसीचा चित्रकार तो -अक्षया गुरव
एक राजकन्या – किरण ढाणे
जुळून येती रेशीमगाठी – प्राजक्ता माळी
साता जल्माच्या गाठी – अक्षया हिंदलकर
राधा प्रेम रंगी रंगली– वीणा जगताप
ललित 205– अमृता पवार
नांदा सौख्यभरे– ऋतुजा बागवे
हेही वाचा : विवाहित पुरुषावर प्रेम करु नका, नीना गुप्तांचा सल्ला
Sujay Dahake on Brahmin Marathi TV Actresses